‘या’ राज्यात मुलींच्या लग्नाचे वय वाढले; 18वरून झाले 21 वर्ष, विधानसभेत विधेयक मंजूर

Himachal Girls Marriage Age: हिमाचलमध्ये आता 21 वर्षापूर्वी मुलींचे लग्न करता येणार नाही. लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे विधेयक सरकारने विधानसभेत मांडले. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे विधेयक कायदा बनणार आहे. मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याची मागणी गेल्या काही काळापासून येथे होत होती.
मसुद्याला सात महिन्यांपूर्वीच मंजुरी –
हिमाचल प्रदेशच्या सुखू सरकारने आपल्या सुधारित मसुद्याला 7 महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती. आता तो सभागृहाने मंजूर केला आहे. हिमाचल प्रदेश बालविवाह प्रतिबंध विधेयक-2024 मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडल्यानंतर मंजूर करण्यात आले. राज्याचे आरोग्य, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री धनीराम शांडिल यांनी बालविवाह प्रतिबंध (हिमाचल प्रदेश सुधारणा विधेयक, २०२४) विधानसभेत मांडले. हे विधेयक चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले.
वय का वाढले?
हे विधेयक विधानसभेत मांडताना मंत्री धनीराम शांडिल म्हणाले की, हा कायदा लागू झाल्याने मुलींना पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. लोक लहान वयात मुलींची लग्न करतात. अशा परिस्थितीत मुलींना शिक्षण घेता येत नाही. यामुळे तिला आयुष्यात पुढे जाता येत नाही. मुलींच्या लवकर लग्नाचा त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. लहान वयात आई झाल्यामुळे मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.





