Chief Minister Relief Fund : भाजपच्या ‘या’ मंत्र्यांचा मोठेपणा; 1 वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा आपत्तीग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला राज्यभरातून दानाचा ओघ सुरू आहे. महायुतीचे आमदार-खासदार एका महिन्याचे पगार दान करण्याचा निर्णय घेत असतानाच, आता राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी उल्लेखनीय पाऊल उचलले आहे.
त्यांनी मंत्रिपदाचे वर्षभराचे संपूर्ण वेतन, म्हणजे ३१ लाख १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दान केले आहे. हा धनादेश आणि संमतीपत्र त्यांनी आज (७ ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले.
महाजन यांनी डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीचे हे वेतन दान केले असून, ते राज्यातील पहिले मंत्री ठरले आहेत ज्यांनी वर्षभराचा पगार एकरकमी दान केला. या दानामुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यास चालना मिळेल. मुख्यमंत्री सहायता निधी हा पूर, दुष्काळ, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधितांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी वापरला जातो. अनेक सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधींनीही आपला वाटा उचलला आहे.
राज्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी विविध जिल्ह्यांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘संकटमोचक’ म्हणून त्यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मदतकार्याला गती मिळाली असून, शासनाच्या बाजूनेही योग्य ती मदत पुरवली जात आहे.
शासन जनतेच्या पाठीशी खंबीर : महाजन
गिरीश महाजन म्हणाले, “राज्यात मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. शासन जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे. शासनाकडून योग्य मदत मिळत असताना, मीही त्यात सहभागी होण्यासाठी माझ्या मंत्री पदाच्या वर्षभराच्या एकूण पगाराचे ३१ लाख १८ हजार २८६ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत देत आहे.” त्यांच्या या उदारतेमुळे सामान्य जनतेत सकारात्मक संदेश गेला असून, इतर नेत्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.





