Girish Mahajan : … तर उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही; गिरीश महाजन यांनी लगावला टोला

भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले असा आरोप केला. राऊतांनी ठाकरेंची शिवसेना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवली. त्यात जी दलाली तुम्ही केली तेवढी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही
एवढंच नाहीतर संजय राऊत जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरजच नाही. कारण तेच पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. राऊतसारख्या दलालांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती म्हणूनच त्यांनी शिवसेनेला कॉंग्रेस व शरद पवार यांच्या दावणीला बांधलं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे सगळे विचार संपवले. राऊतांची बडबड बंद झाली नाही तर शिवसेना शिल्लकच राहणार नाही, उद्धवजींचं देवच भलं करो असं महाजन म्हणाले.
संजय राऊतांच्या वक्तव्याचा घेतला समाचार
ज्यादिवशी सरकार बदलेल त्या दिवशी सर्वात पहिले महाजन पक्ष सोडतील असं राऊत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले मी लहानपणापासून आरएसएसचा स्वयंसेवक आहे. तब्बल ३५ वर्ष झाले मी सातवेळा आमदार म्हणून निवडून येतो आहे. सर्वात सीनिअर मी आहे. माझ्या मनात हा विचार कधी आलाच नाही. सत्ता नसतानाही आम्ही वीस वर्ष विरोधात काम केलं. राऊतांसारख्या बुरसटलेल्या लोकांच्या मनातच असले विचार येतात. आमच्या सारखे कार्यकर्ते एका विचाराणे प्रेरित झाले आहेत, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. आम्हालाही अनेक आमिषे दाखवण्यात आली पण आम्ही आमचा विचार सोडला नाही असे महाजन म्हणाले.





