Girish Mahajan : स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांनी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

नाशिक : राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच याबाबत घोषणा अपेक्षित असताना राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या नाशिकमधील एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुती एकत्र, पण नाशिकबाबत महाजनांचं सूचक वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, पण प्राधान्य महायुतीलाच असेल, असं त्यांनी सांगितलं. मात्र, नाशिकमध्ये बोलताना भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी, “युती झाली तरी नाशिकमध्ये १०० पार, नाही झाली तरी १०० पार,” असं मोठं विधान केलं. या वक्तव्यमुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. महाजन यांनी पुढे सांगितलं, “मी भाजपात सर्वाधिक काळ निवडून आलेला कार्यकर्ता आहे. मीही साधा कार्यकर्ता होतो.” त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीचं चित्र अस्पष्ट
महायुतीकडून निवडणुका एकत्र लढवण्याचे संकेत मिळत असताना, महाविकास आघाडीची रणनीती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढवणार, याबाबत उत्सुकता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या असून, सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.





