Donald Trump-Giorgia Meloni : जॉर्जिया मेलोनींना मिळाला मोठा पाठिंबा.! ट्रम्प यांच्या वैयक्तिक टीकेने बदललं राजकीय समीकरण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यांमुळे युरोपमध्ये एक अनपेक्षित राजकीय बदल दिसून येत आहे.

Donald Trump – Giorgia Meloni : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यांमुळे युरोपमध्ये एक अनपेक्षित राजकीय बदल दिसून येत आहे.
ट्रम्प यांच्या दबावासमोर न झुकता युरोपीय नेत्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारत पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे युरोपीय देशांमध्ये नवी एकजूट निर्माण होत आहे.
ट्रम्प यांनी इटलीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मेलोनी यांनी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी लाचारी पत्करल्याचा दावा केला होता. या विधानानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि पोलंडच्या नेत्यांनी मेलोनी यांना पाठिंबा दिला. युरोपचे नेते आता संरक्षण, आयात शुल्क आणि परराष्ट्र धोरणांवर एकत्र येऊन काम करत आहेत.
युक्रेन आणि इराणमधील युद्ध, तसेच चीनसोबत वाढती व्यापारी तूट यांसारख्या आव्हानांमुळे युरोपला एकात्मिक भूमिका घेणे गरजेचे बनले आहे. ट्रम्प यांना युरोपीय देशांशी वैयक्तिक पातळीवर वाटाघाटी करणे आवडते, परंतु या एकजुटीमुळे त्यांची कोंडी होऊ शकते.
एकेकाळी ट्रम्प यांचे कौतुक करणाऱ्या फ्रान्स आणि जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी पक्षांनीही आता ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीवर आणि व्यापारी धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
हंगेरीमध्ये ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व्हिक्टर ऑर्बन यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामागे ट्रम्प यांच्यासोबतची जवळीक हे एक कारण मानले जात आहे. इटलीमध्ये सध्या ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल तीव्र असंतोष आहे.
एका सर्वेक्षणानुसार, ८३% इटालियन नागरिकांचा ट्रम्प यांच्यावर विश्वास नाही. इटलीमध्ये आगामी काळात निवडणुका होणार असल्याने, मेलोनी यांनीही ट्रम्प यांच्यापासून राजकीय अंतर राखणे पसंत केल्याचेही दिसून आले आहे.






