घोडेगाव कांदा मार्केटने कात टाकली

अविनाश येळवंडे
घोडेगाव : जिल्ह्यासह राज्यात नावलौकिकाला असलेल्या घोडेगाव कांदा मार्केट येथील १६ कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांना सुरुवात झाली असून, सध्या हे काम अतिशय जोरदार सुरू आहे. अंडरग्राऊंड नाल्या, खोदकाम, खडीकरण,मजबुतीकरण ही कामे सध्या सुरू आहेत. कामाचा दर्जा चांगला असल्यामुळे लवकरच मार्केटचे रुपडे पालटणार आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे घोडेगाव कांदा मार्केट हे कांदा खरेदी व विक्रीसाठी देशात प्रसिद्ध आहे. छ. संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, कन्नड, पैठण, बीड, पाथर्डी, शेवगाव,राहुरी, नगरसह अनेक तालुक्यातून व जिल्ह्यातून कांदा विक्रीसाठी घोडेगाव मार्केटला आणला जातो. देशातील प्रमुख राज्यातून कांदा व्यापारी खरेदीसाठी घोडेगाव येथे येत असतात. येथील कांदा देशातील सर्व मुख्य स्टेशनला कांदा पाठवतात. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार राज्यातील लासलगाव, बसवंत पिंपळगावसारख्या मोठ्या कांदा मार्केटच्या बरोबरीने घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांदा आवक झाली. राज्यातील सर्वाधिक कांदा आवक येणाऱ्या मार्केटमध्ये घोडेगाव मार्केटचा पाचवा क्रमांक राहिला आहे.
चोख व पारदर्शी व्यवहारामुळे नावारूपास आलेले घोडेगाव मार्केट मध्ये पावसाळ्यात मोठा त्रास शेतकऱ्यांना, व्यापारी व इतर घटकांना सहन करावा लागायचा. काळवटीची असलेली जमीन व पावसामुळे होणारा चिखल यामुळे प्रांगणात पायी अथवा गाडीने जाणे त्रासदायक होत होते. अनेकदा शेतकरी वर्ग या मार्केटमध्ये डांबरीकरण अथवा काँक्रेटिकरण करावे, असा आग्रह धरत अस. मार्केट कमिटीने मंत्रालय, पणन महामंडळाकडे अनेकदा विकासकामांबाबत प्रस्ताव सादर केले होते, परंतु प्रस्ताव वेळोवेळी लालफितीत अडकून पडायचे अथवा फेटाळला जायचा. यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोप वेळोवेळी केला जायचा. तालुक्यातील विरोधकांनी देखील या मार्केटमधील व्हिडीओ, फोटोद्वारे राजकीय मुद्दा बनवून फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु आ.गडाख यांनी 16 कोटींच्या कामाद्वारे विरोधकांना चितपट करून हा विरोधी मुद्दाच खोडून काढला आहे.
आ.शंकरराव गडाख पाटील यांनी आपले कसब वापरून सदर प्रस्ताव मंजूर करून आणला व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ.शंकरराव पाटील गडाख व मा.आ.पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचे भूमिपूजन संपन्न झाले व तत्काळ कामास सुरुवात झाली आहे.
कोणकोणती कामे मार्गी लागणार..?
या 16 कोटी रुपयांमध्ये कांदा मार्केट आवारात खडीकरण व काँक्रीटीकरण, म्हैस ,गाय व बैल बाजारात जाण्यासाठी 30 फुटी सिमेंट काँक्रेट रस्ते, आडतदार यांच्या दुकानापुढे सिमेंट काँक्रीट रस्ते, गाय,म्हैस व बैल बाजारात खडीकरण व मजबुतीकरण होणार आहे. संपूर्ण आवारात ड्रेनेज लाईन, दोन प्रवेशद्वार कमान, वॉटर टॅंक व RO प्लॅन्ट, सर्व आवारात टॉयलेट, वृक्षारोपण, नवीन जागेत प्लेट वजन काटा, लाईट हायमॅक्स व सुसज्ज असे इतर विविध विकासकामे पूर्ण होणार आहेत.
आ.शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रयत्नातून सुरू झालेले कांदा मार्केट हे राज्यात अग्रेसर आहे. गाई, म्हशींचा मोठा बाजार भरतो, हा बाजार वृद्धिंगत व्हावा, रोजगार वाढावेत याकडे आ.गडाख यांचे व्यक्तिगत लक्ष असते. काँक्रीटीकरणाचा जो प्रश्न होता त्यासाठी आ.गडाख यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. सत्तांतरानंतर काही राजकीय अडचणी आल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित होता. आ.गडाख यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण काम सुरू आहे. यामुळे बाजाराचा चेहरा मोहरा पालटणार आहे.
नंदकुमार पाटील, सभापती – कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा





