घनी यांनी अफगाणिस्तानचे पैसे परत द्यायलाच पाहिजे – तालिबान

काबूल – अफगामिस्तानातून परागंदा झालेले अध्यक्ष अशर्रफ घनी यांनी पळून जाताना बरोबर नेलेले अफगाणिस्तानचे पैसे तातडीने परत दिलेच पाहिजेत, असे तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हे पैसो अफगाणिस्तानच्या लोकांचे आहेत. घनी देश सोडून पळून गेले. त्यामुळेच देशात अराक स्थिती निर्माण झाली आहे, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने म्हटले आहे.
“जर घनी यांनी आपल्याबरोबर पैसे नेले असतील, तर ते त्यांचे पैसे नाहीत. ते पैसे अफगाणिस्तानच्या लोकांचे आहेत. लोकांचे पैसे घनी यांनी अखेरच्या क्षणी आपल्याबरोबर का नेले? ते त्यांनी परत करायला पाहिजेत.’ असे शाहीनने दोहा येथे दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.
आम्ही शांतपणे सत्तेचे हस्तांतरण होण्याची वाट बघत होतो. फण घनी अचानक पळून गेल्याने अराजक स्थिती निर्माण झाली. त्यांच्या पलायनामुळे अचानक एक पोकळी निर्माण झाली. ही ताबडतोब भरून काढली जाणे आवश्यक होते, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
घनी यांनी आपल्याबरोबर चार कार आणि हेलिकॉप्टर भरून पैसे नेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र घनी यांनी नंतर दिलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते. आपण आपल्याबरोबर केवळ एक कपड्यांचा जड आणि सॅन्डल एवढेच नेले. तालिबानकडून आपल्याला फाशी द्यायला नको म्हणूनच आपल्याला देश सोडून जावे लागल्याचे त्यांनी म्हटले होते.





