रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा

आमदार संजय जगताप यांची सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना सूचना
जेजुरी (वार्ताहर) – बेलसर फाटा ते शिंदवणेपर्यंतच्या रस्त्याचे त्वरित पूर्ण करावे. तसेच मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एका बाजूचे डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस खुला करावा अशा सूचना आ. संजय जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बेलसर फाटा ते उरूळी कांचन रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या व वाहतुकदारांच्या तक्रारी आमदारांकडे येत होते. सोमवार (दि.2) आ. जगताप यांनी सार्वजनिक अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता सत्यशील नगरारे, शाखा अभियंता विलास तांबाळे, स्वतंत्र अभियंता अरविंद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते उपस्थित होते. कामाची पाहणी केल्यानंतर बेलसर येथे रस्त्याच्या बाजूच्या शेतकरी व ग्रामस्थांची बैठकही आमदारांनी घेतली.
या बैठकीला बेलसरच्या सरपंच स्वाती गरूड, माजी सरपंच सुजाता हिंगणे, नीलेश जगताप, बाळासाहेब जगताप, माजी उपसरपंच मामा गरूड, रणधीर जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास होतो आहे. पिकांवरही याचा परिणाम होत आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहतुकीसाठीही मोठी कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केली.
अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
शासनाकडून तळेगाव ढमढेरे ते बेलसर फाटा असा 146 कोटी रुपये खर्चाचा 47 कि.मी लांबीचा हा रस्ता एचएएमअंतर्गत केला जात आहे. पुणे-नाशिक, सोलापूर महामार्ग ते पुणे पंढरपूर महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. या कामा करिता स्थानिकांनीही अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आ. संजय जगताप यांनी केले आहे.





