Pimpri : निवडणुकांसाठी सज्ज व्हा : आमदार शेळके यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार सुनील शेळके यांनी पक्षाचे ध्येय-धोरणे व तालुक्यातील विकासकामे घराघरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम केले पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. या वेळी आमदार शेळके यांनी पक्षाच्या तालुका कार्यकारिणी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व शहराध्यक्ष यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. ज्यांना पदे मिळाली आहेत त्यांनी पक्षनिष्ठेने जबाबदारी पार पाडली पाहिजे. पदे घेऊनही काम न करणाऱ्यांनी स्वतःहून बाजूला व्हावे, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. सहकार विभाग व शासकीय समित्यांमध्ये संधी मिळालेल्यांनी पक्षाच्या कामात प्रामाणिकपणे योगदान द्यावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले.
या वेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, काळूराम मालपोटे, लक्ष्मण बालगुडे, भरत येवले, नारायण पाळेकर, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, कार्याध्यक्षा कल्याणी काजळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा वर्षा नवघणे, युवती आघाडी तालुकाध्यक्ष तेजस्विनी गरुड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांवर हल्लाबोल करत थेट आव्हान
या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना आमदार शेळके म्हणाले, “मी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव घेतले तर विरोधक म्हणतात की राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. मग विरोधकांनी आपला उमेदवार जाहीर करावा आणि पुन्हा एकदा आजमावून पाहावे,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
महायुतून लढल्यास एकहाती सत्ता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्याचा पुनरुच्चार करत आमदार शेळके म्हणाले की, ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र आली तशीच एकता स्थानिक स्वराज्य संस्थांत दाखवली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महायुतीला एकहाती सत्ता मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.





