लग्न करा नाहीतर कामावरून काढले जाईल; चीनच्या कंपनीने काढला होता फतवा

बीजिंग : लग्न करा अन्यथा तुम्हाला नोकरी गमवावी लागेल असा निर्वाणीचा इशारा चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला होता. कंपनीच्या या आदेशामुळे खळबळ निर्माण झाली होती व त्याचा निषेध करण्यात आला होता. होत असलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर मनुष्यबळ विभाग आणि सामाजिक सुरक्षा विभागाने हस्तक्षेप केल्यानंतर कंपनीला आपला हा आदेश मागे घेत नवा सुधारणा आदेश जारी करावा लागला.
आमच्या धोरणामुळे कामगार कायद्यांचे उल्लंघन झाले आहे असे नमूद करत कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. या प्रकरणात एका एका चिनी कंपनीने हे धक्कादायक धोरण आणले होते. ज्यामध्ये कंपनीने सप्टेंबरपर्यंत लग्न न केल्यास अविवाहित आणि घटस्फोटित कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची धमकी दिली होती. या धोरणानंतर कंपनीला टीकेचा सामना करावा लागतो आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, टीका, संताप आणि सरकारी हस्तक्षेपानंतर शेडोंगच्या शुंटियन केमिकल ग्रुपने लागू केलेले हे धोरण मागे घेण्यात आले आहे.
जानेवारीमध्ये, शुंटियन केमिकल ग्रुपने २८ ते ५८ वयोगटातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून हे धोरण आणले होते. कर्मचाऱ्यांनी सप्टेंबरपर्यंत लग्न करून स्थायिक व्हावे असे त्यात बजावण्यात आले हाते. जूनपर्यंत लग्न न करणाऱ्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाईल आणि जर त्याने सप्टेंबरपर्यंत लग्न केले नाही तर त्याला नोकरीवरून काढून टाकले जाईल असे सांगण्यात आले होते.
कंपनीने दावा केला की त्यांचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांमध्ये कठोर परिश्रम, दयाळूपणा, निष्ठा आणि सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे आहे. कंपनीचा हा आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व त्यानंतरच टीका सुरू झाली होती. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कंपनीवर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका केली आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केल्याचा आरोपही केला. एका वापरकर्त्याने लिहिले की, कंपनीचे नियम आणि कायदे सामाजिक नैतिक मूल्यांपेक्षा वरचे असू शकत नाहीत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, चीनचा विवाह कायदा निवडीच्या स्वातंत्र्याची हमी देतो.





