एमआयटी संघास सर्वसाधारण विजेतेपद

पुणे: एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ संघाने राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्यांना 102 गुण मिळाले. गोवा येथील बिट्‌स पिलानी संघाने 34 गुणांसह उपविजेतेपद मिळविले. ही स्पर्धा एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नितिन मदने व आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेतील रौप्य पदक विजेता तुषार गायकवाड यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत देशभरातील 66 महाविद्यालयांतून 2500 विद्यार्थ्यांनी एकूण 15 क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉन टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, स्क्वॅश, वॉटरपोलो, जलतरण, रोईंग व कबड्डी या 15 क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. नितिन मदने याने सांगितले की, खेळ व शिक्षण या दोन्ही गोष्टीमध्ये लक्ष निर्धारित केल्यास यश आपोआपच मिळेल. परिश्रमाचे फळ मिळतेच. या देशात कबड्डी या खेळाला बेसिक लेवलचा खेळ समझतात. परंतू सर्वाधिक “टीआरपी’ वाढविणारा खेळ कबड्डीच आहे. प्रत्येकाने कठोर परिश्रम केल्यास प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. खेळामुळेच आज मला महाराष्ट्र सरकारने पोलिस विभागात वरिष्ठ पदावर नियुक्‍त केले आहे.

गायकवाड म्हणाला की, कोणताही खेळ खेळतांना सर्वात प्रथम मानसिकदृष्या सशक्‍त होण्याची गरज आहे. सतत सराव केल्याने खेळात यश मिळतेच. तसेच समर्पण भावाने खेळल्याने तुम्ही विजेते होऊ शकाल. खेळामध्ये यश व अपयश हे सतत चालत राहणार आहेच. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. खेळाची तुलना फक्त गुणवत्तेच्या आधारे होते. खेळाडूला मिळालेले पदक हे त्याला प्रेरणा देण्यासाठी प्रदान करण्यात येते.

पारितोषिक वितरणप्रसंगी एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डी.पी.आपटे, सचिव प्रा.डॉ.प्रशांत दवे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल.के.क्षीरसागर, डॉ. बी.एस. कुचेकर, स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ. पी. जी. धनवे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)