जनरल बिपीन रावत हेलीकॉप्टर दुर्घटना चौकशी अहवाल पूर्ण

नवी दिल्ली – देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या 13 सहकाऱ्यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा चौकशी अहवाल पूर्ण झाला असून तो हवाई दल प्रमुखांना जानेवारी महिन्यातच सादर करण्यात येईल, असे संरक्षण दलातील सुत्रांनी सांगितले.
या चौकशी अहवालाच्या निष्कर्षाबाबत हवाई दलाकडून अधिकृतपणे एक शब्दही अद्याप व्यक्त करण्यात आला नाही. मात्र, यात काही तांत्रिक अथवा मानवी चूक कारणीभूत नसून भूप्रदेशात नियंत्रित उड्डाणामुळे (सीआयएफटी) पायलटच्या हेतूविना कोणत्या तरी पृष्ठभागाला ते धडकले असावे, असा निष्कर्ष असू शकतो, असे सूत्रांनी सुचवल्याचे एका इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
सीआयएफटी म्हणजे हेलिकॉप्टर हवेत असते आणि पायलटचा कोणताही दोष नसतो. ही दुर्घटना जेथे घडली त्या कन्नूर भागात प्रतीकूल हवामानामुळे दृष्यमानता कमी होती, असे त्यांनी सांगितले सीआयएफटी हेच जगातील बहुतांश दुर्घटनांचे मुख्य कारण असते.
अपघाताच्या तपशीलावर अंतिम अहवालात प्रकाशझोत पडू शकेल. तीन्ही दलांच्या कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे प्रमुख एअर मार्शल मानवेंद्र सिंग आहेत.
ते हवाई दलातील सर्वात ज्येष्ठ हेलिाकॉप्टर पायलट आहेत. या कोर्ट ऑफ एन्क्वायरीची घोषणा हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर चौधरी यांनी केली होती. हा अहवाल सादर करण्यापुर्वी त्याच्या सर्व औपचारिकता पाळण्यात येतील तसेच त्यातील निष्कर्षाची कायदेशीर पडताळणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
या हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स अपघातानंतर तातडीने हस्तगत करण्यात आला होता. फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर याचाही अभ्यास हा अहवाल तयार करण्यापुर्वी करण्यात आला होता. कन्नूरच्या जंगलात हे पेटलेले हेलिकॉप्टर पडताना स्थानिक नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे घटनास्थळावर धाव घेतल्यानंतर हेलिकॉप्टरचे पेटते अवशेष आढळले होते.





