पुणे जिल्हा | घोडेगाव येथे उद्या दिव्यांग मतदार जनजागृती महाशिबिर

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदार जनजागृती महाशिबिर गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता बाजार तळ, वनमाला मंगल कार्यालय जवळ घोडेगाव येथे तहसील कार्यालय, घोडेगाव व समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था यांच्या वतीने आयोजित केले आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.
या महाशिबिरामध्ये दिव्यांग मतदार जनजागृती, अंध प्रवर्गमध्ये ईव्हीएम मशीन, प्रात्याक्षिक, रॅली, प्रश्न मंजुषा, मतदान जनजागृती, गीत ,पथनाटय, मतदान केंद्र, सोयी सुविधा, अस्थिव्यंग गटामध्ये रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, मतदान माझा हक्क, पथनाट्य नाव नोंदणी, पोस्टल मतदान,
घोषवाक्ये, कर्णबधीर गटामध्ये रांगोळी स्पर्धा, घोषवाक्ये, चित्रकला, पथनाट्य, रॅली इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती कार्यक्रम उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याची माहिती आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.





