Pune : जीबीएस वाढतोय! पुण्यात दोन, पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा मूत्यू; राज्यातील एकूण रुग्णसंख्या १४० वर

पुणेः गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या रुग्णसंख्येत १० ने वाढ झाली असून आता राज्यातील एकूण रुग्णसंख्या १४० वर जाऊन पोहचली आहे. जीबीएसमुळे आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. जीबीएसमुळे आतापर्यंत एकूण पाच रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. जीबीएसने नागपूर, सोलापूर , कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही शिरकाव केला आहे.
पूना हॅास्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू जीबीएसमुळे शुक्रवारी सकाळी झाला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात एका ६५ वर्षांच्या पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. ते नांदेड गावातील रहिवासी होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपळे गुरव परिसरातील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली. न्यूमोनियामुळे श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूची संख्या ५ वर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसची रुग्णसंख्या वाढत आहे. हा खरंतर चिंतेचा विषय आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे पालन जिल्ह्यांना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात जीबीएसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद सोलापूरमध्ये झाली होती. त्यानंतर ससून सर्वेापचार रुग्णालयात ५६ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ वर जाऊन पोहचली आहे.





