Gaza war : गाझामध्ये इस्रायल आणि हमास दरम्यानच्या युद्धात ठार झालेल्या पॅलेस्टिनींची संख्या ६२ हजारांवर पोचली आहे, असे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या २४ तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये ६० लोक ठार झाले. त्यामुळे गेल्या २२ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात मरण पावणाऱ्या पॅलेस्टिनींची संख्या ६२ हजार ४ इतकी झाली आहे. याशिवाय १ लाख ५६ हजार २३० लोक जखमी झाले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ठार झालेल्यांपैकी १,९६५ लोक मदत केंद्रांजवळ अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात ठार झाले किंवा त्यांना मारले गेले आहे. आज सकाळी मदत केंद्रांजवळ मदत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले किमान ७ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र मरण पावलेल्यांमध्ये सामान्य नागरिक किती होते आणि लढणारे किती होते, याची वेगवेगळी आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली नाही. ही आकडेवारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तपशीलाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राने आणि अन्य तटस्थ तज्ज्ञांनी ही आकडेवारी पुरेशी विश्वासार्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र इस्रायलने या आकडेवारीवर विश्वास दाखवलेला नाही. मात्र गाझामध्ये मरण पावणाऱ्यांची स्वतंत्र आकडेवारी इस्रायलने उपलब्ध केलेली नाही. पॅलेस्टिनींना दक्षिण गाझामध्ये विस्थापित करून मोठी लष्करी कारवाई सुरू करण्याच्या इस्रायलच्या योजनेवर मोठी टीका केली जाते आहे. इजिप्तने सोमवारी इस्रायलच्या या मोहिमेवर टीका केली. कतारच्या बरोबर मिळून इजिप्त पुन्हा युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी सुरू करणार असल्याचे इजिप्तने म्हटले आहे.