Gaza : गाझामधील रफाह क्रॉसिंग बंदच राहणार; सोमवारी मार्ग खुला होणार

कैरो, (इजिप्त) : गाझा आणि इजिप्तमधील रफाह सीमा क्रॉसिंग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील, असे इस्रायलने शनिवारी सांगितले. गाझामध्ये परतणाऱ्या लोकांसाठी बाहेरील जगासाठी हे एकमेव प्रवेशद्वार असून सोमवारी हा मार्ग पुन्हा उघडेल, असे इजिप्तमधील पॅलेस्टिनी दूतावासाने सांगितले होते. त्यावर इस्रायलने हे स्पष्टिकरण दिले आहे. रफाहचा मार्ग पुन्हा उघडणे हे हमास सर्व २८ मृत बंधकांचे अवशेष परत करण्याची युद्धबंदीची भूमिका कशी पूर्ण करते यावर अवलंबून असेल, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले. रविवारी क्रॉसिंग पुन्हा उघडले जाण्याची शक्यता आहे, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते.
हमासने १० ओलिसांचे अवशेष सुपूर्द केले आहेत. हमासची सशस्त्र शाखा शनिवारी रात्री आणखी दोघांचे अवशेष सुपूर्द करेल, परंतु त्यांची ओळख पटणार नाही, असे एका निवेदनात, हमासने सांगितले होते. युद्धापूर्वी इस्रायलच्या नियंत्रणाखाली नव्हते, असे रफाह क्रॉसिंग हे एकमेव क्रॉसिंग आहे. मे २०२४ मध्ये इस्रायलने गाझा बाजूचा ताबा घेतल्यापासून रफाहचा इजिप्तला जोडणारा मार्ग बंद आहे. इजिप्तमध्ये हजारो पॅलेस्टिनी राहतात. क्रॉसिंग पूर्णपणे उघडल्यास गाझाच्या लोकांना वैद्यकीय उपचार घेणे, प्रवास करणे किंवा इजिप्तमध्ये कुटुंबाला भेटणे सोपे होईल.
इस्रायलकडूनही पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका सुरू आहे. काही पॅलेस्टिनींचे मृतदेहही परत केले जात आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही ओळख पटवली जात नाही आहे. केवळ क्रमांकाच्या आधारे या कैद्यांची ओळख निश्चित केली जाते आहे. गाझाचे आरोग्य मंत्रालय त्यांचे फोटो ऑनलाइन पोस्ट करत आहे. तसे केल्याने या कैद्यांचे कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी पुढे येतील अशी आशा आहे.





