“शिवसागर बोटिंग’साठी गावडेवाडीला पसंती

विजय लाड
कोयनानगर – गेली अनेक वर्षांपासून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग सुरू करण्यात यावे, ही प्रमुख मागणी अखेर पूर्ण झाली आहे. धरणापासून सात किलोमीटर अंतरावर उत्तरेकडील गावडेवाडी हे ठिकाण बोटिंग स्पॉटसाठी गृह विभागाने निश्चित केले आहे. तसे राजपत्रही शासनाने जाहीर केले आहे. बोटिंगच्या माध्यमातून स्थानिकांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बोटिंगला परवानगी देण्यात आली होती. परंतू, गृह विभागाने जाहीर केलेला बोटिंग स्पॉट निर्मनुष्य ठिकाणी असल्याने स्थानिकांमधून प्रचंड नाराजी व असंतोष व्यक्त होत आहे.
कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात अनेक वर्षांपासून बोटिंग बंद असल्याने त्याचा पर्यटनासह स्थानिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. गत 10 वर्षांपासून बोटिंग सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोयना धरण हे प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने येथील बोटिंगसाठी वन्यजीव व जलसंपदा विभागासह गृहमंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. या तिन्ही विभागात ताळमेळ नसल्याने कोयनेचे बोटिंग कागदावरच तरंगत होते. वन्यजीव विभागाने बोटिंगला सशर्त परवानगी दिली असली, तरी जलसंपदा विभागाने धरणाच्या भिंतीपासून सात किलोमीटरपुढे अशी अंतराची अट घातली. तर गृह विभागाने धरणाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबतची सबब दिली होती.
धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर पुढे बोटिंग सुरू करावे, अशी मागणी पाटणचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली असली, तरी गृह विभागाने यास अनुकुलता दाखवली नसून जलसंपदा व गृह विभागाचे एकमत झाल्यामुळे सात किलोमीटर अंतरावर बोटिंग सुरू होण्याचे संकेत होते. चार महिन्यांपूर्वी कोयना धरण परिसराची केंद्रीय पथकाने पाहणी केली होती. जलसंपदा विभागाने सात किलोमीटर अंतराच्या मागणीला या पाहणी दौऱ्यात ग्रीन सिग्नल दिला होता.
याबाबत गृह विभागाने दि. 6 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या राजपत्रात कोयना धरण, इतर बांधकाम आणि कोयना धरणापासून सात किलोमीटरचा शिवसागर जलाशय प्रतिबंधीत उत्तर सीमेच्या पलीकडील दोन किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र बफर झोन म्हणून ओळखण्यात यावे, असे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे. याचा डावा किनारा गावडेवाडी गाव असेल, तर उजवा किनारा किसरूळे गाव असल्याचे राजपत्रात स्पष्ट नमूद केले आहे. शासनाचे उपसचिव चेतन निकम यांनी हे राजपत्र प्रसिध्द केले आहे. दरम्यान, गावडेवाडी व किसरूळे किनारा ही धरणांतर्गत असणारी गावे निर्मनुष्य आहेत. स्थानिकांच्या विकासासाठी बोटिंग सुरू करण्याचा शासनाचा उद्देश असताना संबंधीत बोटिंग स्पॉट स्थानिकांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे हा स्पॉट स्थानिकांच्या उपयोगात येणार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.





