Gautami Patil: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच वर्ध्यात झालेल्या तिच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ झाला होता. स्टेजवरच नृत्य नीट दिसत नसल्याच्या कारणावरून काही प्रेक्षकांनी राडा घातला, खुर्च्यांची तोडफोड केली आणि वातावरण पूर्णपणे बिघडवलं. पैसे देऊनही कार्यक्रम व्यवस्थित पाहता न आल्याने संतापलेल्या काही तरुणांनी अक्षरशः खुर्च्यांची तोडफोड केली. वर्ध्यातील राड्यामुळे निर्माण झालेली चर्चा वर्धा सांस्कृतिक महोत्सव 2025 मध्ये गौतमीचा परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. नेहमीप्रमाणे मोठी गर्दी जमली होती. मात्र मागच्या बाजूच्या काही लोकांना स्टेजवरील नृत्य स्पष्ट दिसत नव्हतं. यानंतर संतापलेल्या काही प्रेक्षकांनी खुर्च्या फेकायला सुरुवात केली आणि कार्यक्रमात गोंधळ माजला. या प्रकारामुळे सोशल मीडियावरही गौतमीवर पुनः एकदा टीका झाली. ठाण्यातील कार्यक्रम हिट, पण मनात सल कायम वर्ध्यातील घटनेनंतर ठाण्याच्या शास्त्रीनगर येथे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात गौतमीने परफॉर्मन्स दिला. आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख स्वप्निल शेडगे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. येथे तिच्या लावणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गौतमीने ट्रोलिंगबद्दल मनातली खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “मी मेहनत करून कार्यक्रम करते. गर्दीही खूप असते. लोकांना आवडतंही… पण नंतर काहीतरी बोललं जातं, मला विनाकारण ट्रोल केलं जातं. आम्ही कलाकार आहोत, आमचा उदरनिर्वाह या कार्यक्रमांवर अवलंबून आहे. कृपया आम्हाला ट्रोल करणं थांबवा.” प्रेक्षकांना थेट इशारा: “नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका” वर्ध्यातील गोंधळावर बोलताना गौतमीने स्पष्ट शब्दांत प्रेक्षकांना सावध केलं. ती म्हणाली, “जे झालं ते चुकीचं झालं. कृपया कार्यक्रमाला आलात तर शांततेत पाहा. एन्जॉय करायला येत असाल तर नीट बसा, कलाकृतीचा आदर करा. गोंधळ करायचा असेल तर असा कार्यक्रम बिघडवू नका… आणि नाही जमलं तर येऊच नका.” गौतमीने प्रेक्षकांना समजून घेण्याचं आवाहन करताना सांगितलं की कलाकारांना अशा गोंधळाचा खूप त्रास होतो आणि संपूर्ण टीमचं नुकसान होतं. गौतमी पाटीलच्या या थेट इशाऱ्यानंतर सोशल मीडियावर तिच्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे.