प्रभात वृत्तसेवा पुणे – लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने वडगाव बुद्रुक परिसरात एका रिक्षाला धडक दिल्याच्या घटनेला आता राजकीय रंग येत आहे. अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर राजकीय संघर्ष पेटला असून सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांच्या माहितीनुसार ३० सप्टेंबरला पहाटे नवले पुलाजवळच्या अपघातानंतर गौतमी पाटीलला जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. अपघातावेळी ती वाहनात होती का, याची चौकशी सुरू असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती आले आहे. वाहन चालक संतोष उभे हा होता. त्याच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. रोहित पवार- चंद्रकांत पाटलांचे आरोप प्रत्यारोप.. या घटनेला आता राजकीय रंग येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करावी असे सांगितले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. रोहित पवार म्हणाले, तुमच्या मतदारसंघातील कुख्यात गुंड परदेशात पळून गेला, त्यावेळी तुम्ही पोलिसांना फोन केला नाही. गौतमी पाटील गाडीत नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणे हे मंत्रिपदाला शोभणारे नाही. दोषी कोण असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे. यावर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील भाजप मेळाव्यात, कायदा आपलं काम करतोय, दोषींना वाचवण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट केले. गौतमी पाटीलला नोटीस नाही.. अपघातातील कार जप्त केली असून तिचा विमा भरलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज, सीडीआरव्दारे कार चालक निष्पन्न झाला आहे. त्याच्यासोबत दोन मित्र होते. ते खेड शिवापूरलाच उतरले होते. अपघातावेळी तो एकटाच होता. कार चालकाला नोटीस दिल्यानंतर तो हजर झाला होता. कायद्यानुसार अटकेची तरतूद नाही.यापुढेही कायद्यानूसारच सर्व कारवाई होणार आहे. गौतमी पाटीलला कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवलेली नाही. तपास अधिकाऱ्यास गरज वाटली तर ते तिला बोलावू शकतात, असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.