गौतमी देशपांडेच्या घरी लगीघाई सुरू; शेअर केले मेहंदी सोहळ्याचे फोटो

Gautami Deshpande : गायिका मुग्धा आणि प्रथमेश यांचे 21 डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि अभिनेता स्वानंद तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. यापूर्वी गौतमीने स्वानंदसोबतच्या नात्याबाबत कधी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अचानक तिने मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी गौतमी आणि स्वानंदचा एका लग्नातील फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. पण दोघांनीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही.आता लग्नाच्या काही दिवस आधीच दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलंय. त्यामुळं चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. तसंच गौतमीची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं केळवणाचे फोटोही शेअर केले होते. तसंच मृ्ण्मयीनं गौतमीसोबतचा एक फोटो शेअर करत ‘काय वाटतंय’? असं विचारलं होतं.
तर गौतमीने लग्नमंडपातील काही रोमँटिक फोटो शेअर करत त्याला “यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय.. नवी सुरुवात” असं कॅप्शन दिलं होतं. दरम्यान, गौतमी ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.
गौतमीचा होणारा नवरा स्वानंद तेंडुलकर कोण आहे ?
स्वानंद तेंडुलकर एक कंटेंट क्रिएटर असून सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होतात. तसेच तो भाडिपा या लोकप्रिय युट्यूब चॅनेलचा व्हाइस प्रेसिडंट म्हणून काम करत आहे.





