Pune News : सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला गौतम अखेर सापडला; CCTVने उकललं गूढ

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) बुधवारी (20 ऑगस्ट) मित्रांसोबत फिरायला आलेला 24 वर्षीय गौतम गायकवाड हा तरुण अचानक बेपत्ता झाला होता. तानाजी कड्यावरून पाय घसरून तो दरीत पडल्याचा दावा त्याच्या मित्रांनी केला होता.
पुणे ग्रामीण पोलिस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी गेल्या पाच दिवसांपासून त्याचा शोध घेतला. अखेर रविवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी CCTV फुटेजच्या आधारे गौतम सापडला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या CCTV फुटेजमध्ये एक तरुण पळताना आणि लपताना दिसला होता. यामुळे गौतमने जाणीवपूर्वक बेपत्ता होण्याचा कट रचला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो तानाजी कड्यावरून दरीत कोसळला होता, पण CCTVमधील दृश्यांनी पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले. गौतम गायकवाड सापडला असला, तरी या पाच दिवसांत नेमके काय घडले, हे चोखशीअंती स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी हवेली पोलीस ठाण्यात दाखल मिसिंग तक्रारीच्या आधारे तपास तीव्र केला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहे. गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. संध्याकाळी मित्रांना लघुशंकेसाठी जातो असं सागून तो काही अंतरावर गेला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परतलाच नाही, त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला.
या घटनेची माहिती गौतम याच्या मित्रांनी १०० नंबर डायल करून पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पीएसआय दिलीप शिंदे आणि त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. हवेली आपत्ती व्यवस्थापन, मावळा जवान संघटना आणि वनविभागाचे कर्मचारी देखील मदतीसाठी धावून आले. अखेर पाच दिवसाच्या शोधकार्यानंतर गौतमच्या शोध लागला आहे.





