Bengaluru Stampede : ‘जीवापेक्षा काहीही मोठं नाही…’, चेंगराचेंगरीच्या घटनेवर गौतम गंभीर संतप्त

Gautam Gambhir Criticizes Bengaluru Stampede : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, ते कधीच रोड शोचे समर्थक नव्हते. तसेच जर आपण रोड शोसाठी पूर्णपणे तयार नसू, तर असे आयोजन करायला नको. कोलकात्याच्या दोन आयपीएल जेतेपदाच्या उत्सवांचा आणि २००७ च्या टी-२० विश्वचषक विजय अभियानाचा भाग असलेल्या गंभीर यांनी सर्वांना ‘जबाबदार नागरिक’ बनण्याचे आवाहन केले.
कधीही रोड शोचा समर्थक नव्हतो – गौतम गंभीर
गौतम गंभीर पत्रकार परिषदेत म्हणाले, “मी कधीही रोड शोचा समर्थक नव्हतो. आपल्याला जबाबदार नागरिक बनण्याची गरज आहे. मी खेळत असतानाही मला यावर विश्वास होता. २००७ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतरही मी हेच सांगितले होते. जर आपण रोड शोसाठी तयार नव्हतो, तर ते करायला नको होते. प्रत्येकाचे आयुष्य खूप महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की भविष्यात असे कोणतेही रोड शो होणार नाहीत.”
Gautam Gambhir reacts to the tragic incident outside Chinnaswamy Stadium during RCB’s victory celebrations. 🗣️#IPL2025 #Bengaluru #GautamGambhir #RCB pic.twitter.com/XpNqoXo7Ss
— Sportskeeda (@Sportskeeda) June 5, 2025
जबाबदार नागरिक होण्याची गरज – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक
गौतम गंभीर पुढे म्हणाले, “जे काही घडले ते चुकीचे आहे. माझ्या संवेदना सर्वांशी आहेत. आपल्याला जबाबदार नागरिक होण्याची गरज आहे. जर आपण सांभाळू शकत नव्हतो, तर हा रोड शो करायलाच नको होता. खेळाडू आणि फ्रँचायझी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण सर्वकाही कसे व्यवस्थित हाताळतो.” यासाठी कोण जबाबदार आहे किंवा गेल्या काही वर्षांत चाहत्यांचा स्वभाव बदलला आहे का? यावर गंभीरने कोणतेही भाष्य केले नाही.
जीवनापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही – गंभीर
त्यांनी पुढे म्हटले, “भविष्यात, अशा रोड शोचे नियोजन करताना आपण अधिक सावध राहायला हवे. आपण असा समारंभ स्टेडियमच्या आत आयोजित करण्याचा विचार करू शकतो. आपण असं करायला नको होतं. चाहते उत्साही असतात, चाहते भावनिक असतात, पण जीवनापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. आपण कोणत्याही वेळी ११ लोक गमावू शकत नाही. माझ्या मते, रोड शो आयोजित करायला नको होता.”





