पीटीआयच्या अध्यक्षपदावरून गौहर खान यांना हटवले

नवी दिल्ली – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या अध्यक्षपदावरून गौहर खान यांना हटवण्यात आले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत प्रभावशून्य कामगिरी आणि कर्तृत्वशून्यतेच्या आरोपामुळे त्यांना तडकाफडकी अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये पीटीआय पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर
पीटीआयचे वरिष्ठ नेते शेर अफजल मरवात यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पीटीआयच्या अध्यक्षपदासाठी बॅरिस्टर अली जाफर यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. पक्षांतर्गत निवडणुका ३ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत, असे गौहर खान यांनी गुरुवारीच स्पष्ट केले होते.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही पीटीआयच्या पक्षांतर्गत निवडणूका बेकायदेशीर ठरवल्यापासून पीटीआय पक्षाला कोणीही अध्यक्ष नव्हते. निवडणूक आयोगाने पीटीआयचे निवडणूक चिन्ह क्रिकेटची बॅट देखील काढून घेतले होते.
निवडणुकीमध्ये पक्षाला आपल्या निवडणूक चिन्हाशिवाय उतरावे लागले होते. निवडणूकीवर गौहर खान यांचा प्रभाव देखील पडू शकला नव्हता. गौहर खान हे व्यक्तीशः सज्जन व्यक्ती असले, तरी त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत असल्याचे बॅ. मरवात यांनी सांगितले.





