Gas Price Hike : तुमचं किचन बजेट कोलमडणार? घरगुती सिलिंडर ६० रुपयांनी महागला..वाचा नवी दरवाढ
Gas Price Hike : घरगुती सिलेंडर ६० तर व्यावसायिक सिलेंडर ११५ रुपयांनी महागले; गॅस टंचाईच्या भीतीपोटी बुकिंगमध्ये वाढ झाल्याने काळाबाजार होण्याची शक्यता.

Gas Price Hike – इराण आणि इजराइल, अमेरिका युद्धाने शहरातील खानावळी आणि स्नॅक्स सेंटरचे गणित बिघडविले आहे. अचानकच झालेल्या दरवाढीचा थेट फटका या लहान व्यावसायिकांना बसणार आहे. शहरात खूप मोठ्या संख्येने बॅचलर तरुण-तरुणी राहतात. यांच्या जेवण आणि नाष्ट्यासाठी शहरात हजारोंच्या संख्येने लहान-मोठ्या खानावळी, चहाच्या टपऱ्या आणि स्नॅक्स सेंटर सुरु आहेत.
या लहान व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरावे लागतात. दर दोन ते तीन दिवसाला एक सिलेंडर लागत असलेल्या व्यावसायिकांचे दरवाढीने आर्थिक गणित बिघडत आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ, तर व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला आहे.
विशेषतः गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्याच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाबे, कॅन्टीन, बेकरी तसेच इतर लघु व्यवसायांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळात इंधनाचे दर वाढतील का, तसेच त्याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होईल का, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची भावना आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील प्रमुख तेल वितरण कंपन्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून एलपीजीचे वितरण केले जाते.
घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक आणि औद्योगिक गॅसच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आणल्याचेही सांगितले जात आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅन्टीन, बेकरी आणि मिठाई उद्योगांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
१९ किलोच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही हॉटेल चालक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी किंवा इंडक्शनचा वापर करण्याचा विचार करत आहेत. मात्र त्यामुळे वीज खर्च वाढून पदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होऊ शकतो.
काळाबाजार वाढण्याची भीती
पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ कायम राहिल्यास एलपीजी आयातीचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे देशांतर्गत गॅस दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार, अतिरिक्त दर आकारणे किंवा गॅस चोरीचे प्रकार वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, जागतिक राजकीय तणावाचा परिणाम भारतातील ऊर्जा बाजारावर होत असून त्याचे पडसाद सर्वसामान्य नागरिकांपासून ते छोटे-मोठे व्यवसायिकांपर्यंत उमटताना दिसत आहेत.
“मी तीन दिवसांपूर्वी ऑनलाइन गॅस बुक करून त्याचे पेमेंटही केले होते. आता दरवाढ झाल्याचे कारण देत डिलरकडून अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत. आम्ही आधीच पैसे भरले असताना हा अधिकचा भार आमच्यावर का टाकला जातो, हा आमचा प्रश्न आहे,”
– राजश्री गोडगे, गृहिणी
“गॅस टंचाईच्या भीतीमुळे लोक मोठ्या प्रमाणात सिलिंडर बुक करत आहेत. विशेषतः मोठ्या कुटुंबांना याचा अधिक त्रास होतो. अशा परिस्थितीत काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही,”
– मानव कांबळे, संचालक, आम्रपाली गॅस एजन्सी






