मलेशियामध्ये मोठी दुर्घटना! गॅस पाईपलाईन फुटून भीषण आग, १०० हून अधिक जखमी

कुआलालांपूर – गॅस पाईप फुटल्यामुळे लागलेल्या आगीत किमान 100 जण जखमी झाल्याची घटना मलेशियाममध्ये घडली आहे. या गॅस पाईपमधून घरगुती वापरासाठीचा गॅस अनेक घरांना पुरवला जात होता. राजधांनी कुआलालांपूरच्या बाहेरच्या भागात या पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यात अनेक जण जखमी झाले. कुआलालांपूरजवळच्या पुत्रा हाईट्स या गॅस स्टेशनजवळ ही घटना घडली.
येथे झालेला स्फोट आणि नंतर लागलेली आग कित्येक किलोमीटर लांबून देखील दिसत होती. पुढे अनेक तासांपर्यंत ही आग आटोक्यात आणता आलेली नव्हती. ईद उल फित्रच्या दुसऱ्या दिवशीची सुटी साजरी केली जात असतानाच ही दुर्घटना घडली.
ही आग सकाळी ८.१० वाजता लागली. फुटलेली पाईप लाईन नंतर वेगळी करण्यात आली, असे पेट्रोगॅस या सरकारी गॅस कंपनीने सांगितले. गॅस पुरवठा थांबवल्यानंतरच आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकले, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीच्या ज्वाळा २० मजले उंचीपर्यंत वाढल्या होत्या. दुपारी २.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निसामक दलाला यश आले.
या आगीमुळे ४९ घरांचे नुकसान झाले आणि ११२ लोक भाजल्यामुळे आणि धुराने स्वास कोंडल्याने जखमी झाले. त्यापैकी ६३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे सेलंगोरचे उप पोलीस प्रमुख मोहम्मद झैनी अबू हसन यांनी सांगितले.
आगीमुळे जवळपासची घरे रिकामी करण्यात आली होती. आगीच्या भडक्याच्यावेळी भूकंप झाल्यासारखे हादरे जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
स्फोटानंतर काही घरांची छप्परे कोसळली आणि त्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. आगीपासून वाचण्यासाठी अनेक जणांनी घरातून पळ काढला होता. या दावपळीतच काहीजण जखमी झाले. खबरदारी म्हणून तीन पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते, मात्र आगीमुळे या पंपांवर काहीही परिणाम झाला नव्हता. आगीच्या कारणांची चौकशी अजूनही सुरू आहे, असे पेट्रोनास कंपनीने सांगितले.





