गॅस पाइपलाइन; मनपाच्या झोळीत 136 कोटी!

नगर – शहरात गॅसच्या पाइपलाइनसाठी रस्त्याची खोदाई सुरु आहे. सावेडी उपनगर परिसरातील चार प्रभागात खोदाई नंतर आता आणखी चार प्रभागात सुमारे 52 किलोमीटर रस्त्यांची खोदाई व 105 किमीचे ड्रिलींग करण्यात येणार आहे. कंपनीने परवानगीसाठी मनपाकडे प्रस्ताव सादर केला असून, खोदाई शुल्कापोटी कंपनीला 136.74 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपाच्या झोळीत 136.74 कोटी जमा होणार आहेत.तसेच 6.83 कोटी रुपयांची अनामत रक्कम बॅंक गॅरंटी स्वरूपात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
गॅस कंपनीकडून शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावेडी उपनगर परिसरातील प्रभाग 1,2, व 4, 5 या प्रभागात खोदाईचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 6, 7, 8, व 9 या चार प्रभागात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यास कंपनीने परवानगी मागितली आहे. या चार ही प्रभागात मिळून 52 किमी रस्त्याची व खोदाई व 105 किमी मीटर ड्रिलींग करून गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. मनपाने खोदाई शुल्कापोटी 136. 74 कोटी रुपये जमा करण्याचे व 6.83 कोटी रुपयांची अनामत रक्कम बॅंक गॅरंटी स्वरूपात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच 6 ते 9 या प्रभागात एकूण 22 किमीचा रस्त्ताची खोदाई करण्यात येणार आहे. 45 किमी चे ड्रिलींग प्रस्तावित आहे. त्यापोटी मनपाला 58.49 कोटी रुपये खोदाई शुल्क व 2.92 कोटी रुपये अनामत रक्कम कंपनीला भरावी लागणार आहे.
बोल्हेगाव व नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये 29 हजार 818 मीटर म्हणजेच सुमारे 30 किलोमीटर खोदाई, तसेच 60 किमी ड्रिलींग प्रस्तावित आहेत. त्यापोटी 78.25 कोटी रुपये खोदाई शुल्क व 3,91 कोटी रुपये अनामत रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. कंपनीकडून त्याची पूर्तता झाल्यानंतर खोदाईसाठी परवानगी दिली जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
मात्र, महापालिकेने सांगितलेली रक्कम कंपनीने जमा केल्यानंतर प्रत्यक्षात खोदाईस सुरूवात होईल. मात्र पावसाळ्यापूर्वी ती संपवावी किंवा त्या मुदतीत खोदाई न संपल्यास पावसाळ्यात खोदाई करण्यास मनाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पावसाळ्यात खोदाई केल्यानंतर नागरिकांना खड्डे, चिखल याचा भयंकर त्रास सहन करावा लागत असल्यामुळे मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रभाग क्र. 6 ते 9 यामध्ये हे पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





