राउरकेला पोलाद कारखान्यात वायूगळती; चार कामगारांचा मृत्यू

भुवनेश्वर –ओडिशातील राउरकेला पोलाद कारखान्यात बुधवारी विषारी वायूची गळती झाली. त्या दुर्घटनेत चार कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडले. इतर काही कामगारांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सेल या सरकारी कंपनीकडून संबंधित पोलाद कारखाना चालवला जातो. त्या कारखान्यातील कोळसा रसायन विभागात सकाळच्या सुमारास कार्बन मोनॉक्साईड वायूची गळती झाली. त्यावेळी 10 कामगार ड्युटीवर होते. विषारी वायू फैलावल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कारखान्याच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
प्रकृती आणखीच गंभीर बनल्याने चौघांना दुसऱ्या रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्या चौघांचे प्राण वाचू शकले नाहीत. वायूगळतीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. कारखान्याच्या प्रशासनाने मृत कामगारांच्या कुटूंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.





