अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतील कंपनीत गॅस गळती; शहरात पसरला केमिकलचा धूर

Ambernath MIDC Gas Leakage | अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरातील कंपनीतून गॅस गळती झाली आहे. निकाकेम प्रॉडक्ट्स कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या गॅस गळतीमुळे अंबरनाथ शहरात धुराचे साम्राज्य पसरले होते. मोठ्या प्रमाणावर शहरात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे.
संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरलेल्या या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास होऊ लागले. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत अंबरनाथ शहरात केमिकल पसरले होते. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस, एमआयडीसी अग्निशमन दल आणि वायू प्रदुषण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
तर एमपीसीबीच्या कल्याण प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मात्र स्वतः न येता चक्क ड्रायव्हरला कंपनीत पाठवल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे एमपीसीबीच्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच आता कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कठोर कारवाई करण्याची मागणी
अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 43 वर निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केलं जातं. अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कारखाने असून तिथून सातत्याने रासायनिक वायू आणि जलप्रदूषण होत असतं. त्यामुळे या कंपन्यांवर एमपीसीबीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या कंपनीच्या आवारात ऑइलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत. उष्णतेमुळे यात केमिकल मिश्रण झाल्याने हवेत वायू पसरला असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच नेमका वायू कोणता आहे याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. सध्या येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे.
हेही वाचा:
‘विकी विद्या का वो व्हिडिओ’ चित्रपटात दिसणार राजकुमार राव – तृप्ती डिमरीची केमेस्ट्री





