Gas Bill Scam: गॅस बिल भरा, नाहीतर कनेक्शन कापणार; एका मेसेजवर दोघांना साडेआठ लाखांचा गंडा
Gas Bill Scam: गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एरंडवणे आणि मुंढवा परिसरातील दोघांना लावला साडेआठ लाखांचा चूना.

Gas Bill Scam – गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चाेरट्यांनी एका महिलेसह दोघांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. एरंडवणे भागातील एका महिलेची सायबर चोरट्यांनी गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी चार लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका ४९ वर्षीय महिलेने अलंकार पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला एरंडवणे भागातील हिमाली सोसायटीत राहायला आहेत.
त्यांना ३० मे रोजी एरंडवणे भागात गॅस पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीच्या नावे संदेश पाठवून गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करायचे आहे. तसे न केल्यास गॅस पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी भीती दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी गॅस देयकाची बनावट एपीके फाइल पाठवून महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली, तसेच मोबाइल क्रमांक ‘हॅक’ करून खात्यातून चार लाख ९७ हजार रुपये काढून घेतले.
खात्यातील पैसे दुसऱ्याच एका खात्यात हस्तांतरित झाल्याचे दिसून आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. अलंकार पोलिसांकडून तपास सुरू आहे. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची तीन लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सागर गोडे तपास करत आहेत.





