Pune Cyber Crime: सव्वा पाच कोटींचा गंडा! उद्योजकाची एनजीपीआय कंपनीकडून मोठी फसवणूक; पत्नीने गाठलं कोर्ट
Pune Cyber Crime: सेनापती बापट रोडवरील ७५ वर्षीय ठाकुर यांच्या तक्रारीनंतर संबंधित बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल धारकांविरोधात गुन्हा दाखल.

Pune Cyber Crime – गुंतवणुकीवर प्रचंड परताव्याचे आमिष दाखवत एका एनजीपीआय कंपनीच्या नावाखाली ज्येष्ठ उद्योजकाची तब्बल ५ कोटी २१ लाख ३७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी संबंधित बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी धारकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. सेनापती बापट रोडवरील ७५ वर्षीय मंगला श्रीनिवास ठाकुर यांच्या तक्रारीनूसार, त्यांचे पती श्रीनिवास ठाकुर हे २०१८ पासून एनजीपीआय कंपनीत गुंतवणूक करत होते.
त्यांना संबंधितांनी मोबाइल कॉल, इ-मेलद्वारे संपर्क साधून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास प्रवृत्त केले. २७ नोव्हेंबर २०१८ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ठाकुर यांनी विविध व्यवहारांद्वारे एकूण ५ कोटी २१ लाख रुपये हस्तांतरित केले. यासाठी आयसीआयसीआय, कॅनरा, ॲक्सिस आणि बँक ऑफ बडोदा येथील खात्यांचा वापर केला. ठाकुर यांच्यावर कर्करोगाचे रुग्णालयात उपचार सुरू असतानाही गुंतवणुकीसाठी त्यांच्यावर दबाव येत होता.
ठाकुर यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यानंतरहीत्यांच्या मोबाईलवर फोन येत राहिल्याने कुटुंबीयांना संशय आला. मुलीने इंटरनेटवर एनजीपीआय कंपनीची माहिती घेतली असता अशी कंपनीचे अस्तित्वात नसल्याचे आढळले. तक्रारीमध्ये अनेक मोबाइल क्रमांक, इ-मेल आयडी तसेच व्यवहारासाठी वापरलेली बँक खाती नमूद केली असून त्यांचा शोध सुरु आहे.





