Garbage Issue: मोशी दुर्घटनेनंतरही पालिकेचा ढिम्म कारभार! शहरात अभूतपूर्व कचराकोंडी, नागरिक संतापले
Garbage Issue: सुरक्षित पर्याय शोधण्याऐवजी लोकवस्तीच्या मध्यभागीच कचरा टाकणे सुरू; कृष्णानगर, महात्मा फुलेनगर आणि मोरेवस्ती परिसरात असह्य दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त.

Garbage Issue – मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. उलट शहरातील विविध भागात जागा मिळेत तिथे कचरा टाकत तिथेच डेपो सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून महापालिका प्रशासना नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप होत आहे. कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे.
हीच परिस्थिती शहरातील इतर भागांमध्ये देखील आहे. बीआरटी मार्ग, उड्डाणपूर्ण, मोकळ्या जागा याठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. लोकवस्तीच्या मध्यभागी कचऱ्याचा नवीन डेपो उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कृष्णानगर भागातील नागरिकांनी केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, भीमशक्ती नगर आणि मोरेवस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात आहे.
त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी, माशा, डास आणि प्रदूषणाचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात शाळा, रुग्णालये आणि दाट लोकवस्ती असल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. मोशी दुर्घटनेनंतरही प्रशासनाने सुरक्षित पर्याय शोधण्याऐवजी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
लोकवस्तीच्या मध्यभागी कचरा साठवून पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. मोशी येथील दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाने पर्यायी जागा शोधत कचरा टाकणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहरामध्ये अभूतपूर्व कचराकोंडी झाल्याचे पाहयला मिळत आहे.
“या प्रश्नाबाबत पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर निवेदन देणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणारा हा प्रकार तात्काळ थांबवला नाही, तर पालिका प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कृष्णानगर परिसरातील कचरा तातडीने अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावा, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”
– मारुती जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस.




