Pune District : मीना नदीकाठचा कचरा हटविला
Pune District : माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्यांना पाठवून कचरा उचलण्यात आला आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.

नारायणगाव : वारूळवाडी व नारायणगाव शहराला जोडणार्या मीना नदीच्या काठावर वारूळवाडी हद्दीत रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टरमधून मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 22) निदर्शनास आला. कचर्यामध्ये मयत व्यक्तींचे फोटो तसेच दुर्गंधीयुक्त कचर्याचा समावेश होता. नागरिकांनी ही बाब ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वारूळवाडी ग्रामपंचायतीने तत्काळ कचरा हटवून नदीकाठ स्वच्छ केला.
स्थानिक नागरिक तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ आणि अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक रमेश मेहेत्रे यांनी या प्रकाराची माहिती वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकांना दिली. माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्यांना पाठवून कचरा उचलण्यात आला आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली.
वारूळवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती असतानाही नदीकाठावर कचरा टाकल्याची माहिती मिळताच तातडीने निर्णय घेऊन स्वच्छता करण्यात आली. मीना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले. मात्र, नारायणगावच्या प्रवेशद्वाराजवळ मीना नदीच्या काठावर अद्याप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. ‘दैनिक प्रभात’मध्ये शनिवारी (दि. 19) ‘नारायणगावच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतरही नारायणगावकडील कचरा हटविण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मीना नदीवरील पूल हा वारूळवाडी व नारायणगाव शहराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नदीचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, कचर्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. या मार्गाने दररोज सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नदीवरील पुलावर कुत्र्यांचा वावर वाढल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नदीकाठाचे नैसर्गिक पर्यावरण आणि परिसराच्या स्वच्छतेवरही कचर्याचा विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान, नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ कचरा उचलण्याबरोबरच पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नारायणगावच्या प्रवेशद्वारावर मीना नदीच्या काठावर साचलेला कचरा तात्काळ उचलण्यात येईल. तसेच भविष्यात पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जाऊ नये, यासाठी आठ दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कचरा टाकणार्यांवर आळा घालण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल,
– सचिन उंडे, ग्रामपंचायत अधिकारी नारायणगाव





