पुणे- रांगोळीच्या पायघड्या, विविध प्रकारची फुले, पाने यांनी सजवलेले विसर्जन कुंड, फुलांची उधळण आणि “मोरया…’चा जयघोष अशा अतिशय उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे रविवारी विसर्जन झाले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने पुणेकरांनी यंदाही आरोग्याला प्राधान्य देत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. फुलांनी सजवलेले विसर्जन कुंड, उत्सवमंडपाच्या आवारातील रांगोळ्या, शंखनाद, पारंपरिक वाद्यांचे सूर अशा मंगलमय वातावरणात हा विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी “करोनाचे विघ्न लवकर दूर कर’,
“बाप्पा मोदक खाऊन जा…करोनाला सोबत घेऊन जा…’
अशी साददेखील कार्यकर्त्यांनी घातली. दरम्यान, गणेशोत्सवात पुणेकरांनी दाखवलेल्या संयमाचे दाद देण्याजोगे चित्र यंदाही विसर्जन दिनी दिसून आले.
मानाचा पहिला : कसबा गणपती
श्रींच्या मूर्तीची विसर्जन पूजा सकाळी पावणेअकरा वाजता सुरू झाली. प्रथेप्रमाणे महापौर मुरलीधर मोहोळ गणपतीला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते. महापौर यांच्या हस्ते “श्रीं’ची आरती झाली. सकाळी 11:29 वाजता “गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते अतिशय उत्साही वातावरणात मंडळ परिसरात सजवलेल्या हौदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा :तांबडी जोगेश्वरी गणपती
सकाळी 11.30 वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तसेच पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्या उपस्थितीत श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विक्रम साराभाई, एम. विश्वैश्वरैय्या अशा महामपुरुषांच्या तसेच ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडू नीरज चोप्रा, अवनी लेखरा, सिन्घराज अधानी, भाविनाबेन पटेल, पी. व्ही. सिंधू यांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “वंदे मातरम्’चा जयघोष करण्यात आला.
मानाचा तिसरा :गुरुजी तालीम गणपती
श्रींचे विसर्जन दुपारी 12.30 वाजता झाले. यावेळी उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन उपस्थित होते. दरम्यान, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. यावेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी, कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते. उत्सवमंडपासून “मोरया…’च्या गजरात प्रातिनिधिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तयार केलेल्या विसर्जन कुंडाला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मानाचा चौथा : श्री तुळशीबाग गणपती
श्रींच्या मूर्तीचे दुपारी 1 वाजता विसर्जन झाले. यावेळी उत्सवमंडपात “गजकुंड’ उभारण्यात आला होता. त्याला पुष्पसजावट करण्यात आली होती. तर, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष विनायक कदम आणि कोषाध्यक्ष नितीन पंडित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती
दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उप-महापौर सुनीता वाडेकर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त रवींद्र शिसवे, आमदार मुक्ता टिळक, डॉ. दीपक टिळक रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक उपस्थित होते. याप्रसंगी प्रथेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीतून बाप्पांची प्रातिनिधिक मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचे वादनही यावेळी झाले.
“दगडूशेठ’च्या श्रींसमोर जयघोष : गणेश कुंडात विसर्जन
पुढच्या वर्षी निर्विघ्नपणे दिमाखात या…
“मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्नपणे दिमाखात या…’ गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात “श्रीमंत दगडूशेठ’ च्या श्रींचे मंदिरात साकारलेल्या दुर्वांनी आणि विविधरंगी फुलांनी सजवलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने 129 व्या वर्षी गणेशोत्सवाची परंपरा जपत मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करत गणपती मंदिरातच उत्सव साजरा करण्यात आला. विसर्जनानंतर “मोरया’च्या जयघोषाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दुमदुमला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने,