Ganja Plants Seized: घराच्या शेजारीच सुरू होती गांजाची शेती; छापा पडताच उडाली खळबळ
Ganja Plants Seized: पोलिसांची धडक कारवाई करत गुणवरे येथील घुलेवस्तीत शेतातील ७ किलो १४३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

Ganja Plants Seized – गुणवरे (ता. फलटण) येथे गांजाची लागवड केलेल्या शेतावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची सुमारे ३४ हजार ६५० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गुणवरे (ता. फलटण, जि. सातारा) येथे एका घराच्या बाजूला गांजाची झाडे लावल्याची माहिती दि. २६ जून रोजी मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घुलेवस्ती येथे छापा टाकला. छाप्यात गांजाची लागवड आढळून आली असून घटनास्थळावरून ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, संतोष मठपती, हवालदार शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, पोलीस नाईक सागर अभंग तसेच कॉन्स्टेबल तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




