Ganeshotsav : गंगा नेब्युला सोसायटीत गणेशोत्सवाचा उत्साह; ‘गीता सार’ अन् ‘काकोरी ट्रेन ॲक्शन’ ठरले आकर्षण
Ganeshotsav : विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘गीता सार’ आणि ‘काकोरी ट्रेन ॲक्शन’ या नाट्यांनी विशेष लक्ष वेधले.

Ganeshotsav : विमान नगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त सोसायटीतील रहिवासी एकत्र आले. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
उत्सवाची सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीच्या मिरवणुकीने झाली. सजविलेल्या गणेशमूर्तीची सोसायटीच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. ढोलांच्या गजरात रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दररोज आरती आणि गणेशपूजेचे आयोजन करण्यात आले.
गणेशोत्सवात नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. लहान मुलांसह सर्व वयोगटातील रहिवाशांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यंदाच्या उत्सवातील विशेष आकर्षण ठरले ते मुलांनी सादर केलेले ‘गीता सार’ हे नाट्य. भगवद्गीतेचे महत्त्व आणि तिच्यातील जीवनमूल्ये या सादरीकरणातून मांडण्यात आली. गीतेतील विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश मुलांनी प्रभावीपणे दिला.
याशिवाय मुलांनी ‘काकोरी कट’, अर्थात ‘काकोरी ट्रेन ॲक्शन’, या ऐतिहासिक घटनेचे नाट्यरूपांतर सादर केले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडलेल्या या घटनेत हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी आवश्यक शस्त्रे खरेदी करण्याच्या उद्देशाने रेल्वेतून नेला जाणारा सरकारी निधी ताब्यात घेतला होता. मुलांच्या सादरीकरणातून या ऐतिहासिक घटनेची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली.
सोसायटीतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले जाते. पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत पद्धतींचा वापर याबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.
गंगा नेब्युला सोसायटीचा गणेशोत्सव धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता रहिवाशांमधील स्नेह, एकोपा आणि सामुदायिक भावना वाढविणारा ठरला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कला सादर करण्याची आणि भारतीय संस्कृतीशी जोडले जाण्याची संधी या उत्सवातून मिळाली.





