Vadgaon: वडगावमध्ये गणरायाला निरोप! दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द
Vadgaon विसर्जन मिरवणुका रद्द करून सामाजिक बांधिलकी जपत गणरायाला निरोप

वडगाव मावळ – शहरातील सात दिवसांच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरात अलीकडे घडलेल्या एकापाठोपाठच्या दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुका रद्द करून साधेपणाने गणरायाचे विसर्जन केले.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्ट आणि श्री बजरंग तालीम मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला शहरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मोठ्या मिरवणुका टाळून मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान तसेच श्री बजरंग तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्य विश्वस्त किरण भिलारे, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, सचिव अनंता कुडे, अरुण चव्हाण, सुभाष जाधव तसेच देवस्थानचे विश्वस्त, श्री पोटोबा देवस्थान गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब तुमकर, संजय दंडेल, चंद्रशेखर म्हाळसकर, सचिव सतीश गाडे, भाऊसाहेब ढोरे, सुधाकर ढोरे, अतुल राऊत, विशाल वहिले, मनोज ढोरे तसेच बजरंग तालीम मित्र मंडळाचे उमेश ढोरे, सुधीर ढोरे, गणेश ढोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वडगाव नगरपंचायतीच्या वतीने गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी भाविक तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. शहरात घडलेल्या दुःखद घटनांमुळे यंदा उत्सवात साधेपणा ठेवण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला.
विसर्जन मिरवणुका रद्द करून सामाजिक बांधिलकी जपत गणरायाला निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वडगाव मावळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विसर्जनस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली.
Satara: ‘बालाजी’च्यावतीने गणेशोत्सव बंदोबस्तावरील पोलिसांना फूड पॅकेट





