कल्याण : कल्याण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेचे इंजेक्शन देऊन कोंडून ठेवत तरुणीवर महिनाभर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या मैत्रिणीसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळाजवळील बल्याणी परिसरात आजी आणि चुलत भाऊ-बहिणीसोबत राहणारी २१ वर्षीय तरुणी बांधकाम ठिकाणी मजुरी करायची. १९ मार्च रोजी आजीसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात तिने घर सोडले आणि बांधकाम ठिकाणी ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली. दुसरी मैत्रीण तिच्याच शेजारी राहत असल्याने कधी तिच्याकडेही राहत होती. १० दिवसांनंतर तिने घरी जात असल्याचे मैत्रिणीना सांगताच त्यांनी संगनमत करून गुड्डू नावाच्या मित्राला बोलावले. गुड्डू आणि तरुणीच्या ओळखीचा गुलफाम कार घेऊन आले. त्यानंतर दोन मैत्रीणी कारमधून तिला घेऊन गेले. मात्र, घरी न सोडता तिला एनआरसी कंपनीमागील चाळीचे काम दाखवण्याच्या बहाण्याने नेवून तेथे तिच्या मानेवर इंजेक्शन देत बेशुद्ध अवस्थेत रामबागेतील लियाकतच्या रूममध्ये सोडले. याच अवस्थेतच लियाकतने तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर येताच पुन्हा नशेचे इंजेक्शन देत त्याने सलग चार ते पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सातत्याने नशेचे औषध देत तिच्यावर सातत्याने बलात्कार केले. दरम्यान, ३ मे रोजी रात्री आंबिवलीतील चाळीत शुद्धीवर येताच तिने खिडकीतून जोरजोरात रडून बाहेर काढण्याची विनंती केली. तेव्हा एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला आजीच्या घरी सोडले. तब्बल महिनाभर बलात्काराने खचलेल्या तरुणीला आजीने धीर दिल्यानंतर मंगळवारी तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.