Pune Crime: पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 4 जणांना अटक
Pune Crime: ५ लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा जप्त; कलर प्रिंटरसह साहित्यही पोलिसांच्या ताब्यात

पुणे : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ६४ हजार रुपये किमतीच्या १ हजार १२८ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू आणि अन्य साहित्य असा एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सलमान जैनद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे), शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखनवाडी, ता. माण, जि. सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
महात्मा फुले मंडईजवळ पहिली कारवाई
महात्मा फुले मंडई परिसरात एक संशयित बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांना दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शुक्रवार पेठेतील महात्मा फुले मंडईच्या मागील बाजूस असलेल्या म्हसोबा मंदिरासमोरील अंतर्गत रस्त्यावर सापळा रचला.
यावेळी सलमान राजे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या. या नोटांची दर्शनी किंमत ४ लाख २ हजार ५०० रुपये होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासातून अन्य तीन आरोपींचा उलगडा
अटक केलेल्या सलमान राजे याच्याकडे चौकशी केली असता, या गुन्ह्यात आणखी तीन साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांचे पथक सातारा आणि कोल्हापूर येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शाफाज अन्सारी, विशाल गलांडे आणि अभिजीत कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
घरातून बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त
आरोपी शाफाज अन्सारी याच्या राहत्या घरातून ५०० रुपयांच्या १ लाख ६१ हजार ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा ईपीएसन कंपनीचा प्रिंटर, एचपी कंपनीचा मॉनिटर, लेनोवो की-बोर्ड व माऊस, झेब्रॉनिक्स कंपनीचा सीपीयू आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले.
या कारवाईत एकूण १ हजार १२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांची दर्शनी किंमत ५ लाख ६४ हजार रुपये आहे. या टोळीने बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेली यंत्रणा आणि त्यांचा पुढील व्यवहार याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप व तपास पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा:





