Ganeshotsav: यंदा ‘बाप्पा’चे आगमन खिशाला पडणार महागात! शाडू मातीच्या मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ
Ganeshotsav: अवकाळी पाऊस, वाहतूक आणि मजुरीच्या वाढत्या दरांचा पेणमधील मूर्ती उद्योगाला मोठा फटका; शाडू मूर्तींचे उत्पादन घटले.

Ganeshotsav – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक होण्यासाठी प्रशासनाने आताच पावले उचलण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि शाडू मातीच्या गणेशमूर्ती या विषयावरील चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. पीओपी मूर्तींवरील बंदीसंदर्भात विक्रेते व मूर्तिकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने संपूर्ण बंदीचा निर्णय सध्या तरी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे साताऱ्यात दोन्ही प्रकारच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री सुरू आहे. यंदा उन्हाळ्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार व अवकाळी पावसाचा मोठा फटका गणेशमूर्तींची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्ती उद्योगाला बसला. सुमारे तीन लाख मूर्तींचे नुकसान झाल्याने शाडू मातीच्या मूर्तींच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यासोबतच नैसर्गिक शाडू माती, रंग, वाहतूक आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे शाडू मूर्तींच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
परिणामी यंदा बाप्पांचे स्वागत भाविकांच्या खिशाला अधिक झळ पोहोचवणारे ठरणार आहे. साताऱ्यातील कुंभारवाड्यात पीओपी मूर्ती बनविण्याची लगबग अंतिम टप्प्यात असून सध्या सुमारे दीड हजार मूर्ती तयार होत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर मूर्तीकारांनी कामाला वेग दिला आहे. तसेच यंदा पीओपी मूर्तींच्या मागणीतही सुमारे १० टक्के वाढ होण्याची शक्यता मूर्तीकारांकडून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचे आवाहन केले जाते.
मात्र, अचूक साच्यातून तयार होणारा आकार, आकर्षक रंगसंगती आणि देखणेपणा यामुळे अनेक भाविकांची पसंती अद्यापही पीओपी मूर्तींनाच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाचा विचार करून मोठ्या संख्येने सातारकर शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापनाही करत आहेत. पीओपी आणि शाडू माती या दोन्ही प्रकारच्या मूर्तींबाबतचा पर्यावरण विरुद्ध परंपरा हा वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, गणरायाच्या आगमनात या वादाचे विघ्न नको,
अशी भावना भाविकांमध्ये व्यक्त होत असून दोन्ही प्रकारच्या मूर्तींना बाजारात मागणी असल्याचे दिसून येत आहे. यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने कृत्रिम विसर्जन हौद व कृत्रिम तळ्यांची उभारणी आणि दुरुस्ती करण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी प्रशासन, मूर्तिकार आणि भाविक यांनी समन्वयाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






