Ganeshotsav 2026: एफडीएच्या कारवाईचा थेट धसका! पिंपरीतील मिठाई दुकानांमधून भडक रंग गायब
Ganeshotsav 2026: पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील मिठाई दुकानांमध्ये गर्दी; अन्न सुरक्षा नियमांचे पालन करत विक्रेत्यांकडून पारदर्शकतेला प्राधान्य.

Ganeshotsav 2026 – मिठाईचा रंग जितका भडक, तितकी ती आकर्षक, असा समज आता मागे पडू लागला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिठाई दुकानांमध्ये यंदा याचे चित्र दिसत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेत विक्रेत्यांनी नियमबाह्य आणि अतिरेकी रंगांचा वापर टाळला आहे. त्यामुळे दुकानांच्या काउंटरवर पूर्वी दिसणारी गडद रंगांची मिठाई कमी झाली आहे.
नैसर्गिक रंग आणि साध्या स्वरूपातील मिठाईला ग्राहकही पसंती देत आहेत. गणेशोत्सवाच्या खरेदीला शहरात वेग आला आहे. गणरायाच्या नैवेद्यासाठी मिठाईची मागणी वाढली आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठीही मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी केली जात आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आणि सांगवी परिसरातील मिठाई दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे.
मोदकांपासून पेढ्यांपर्यंत विविध पदार्थ दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. मावा पेढे, काजू कतली, मोतीचूर लाडू, बुंदी, जिलेबी, चमचम आणि रसगुल्ल्यांची विक्री वाढली आहे. बंगाली मिठाईचेही अनेक प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भडक रंगांना विक्रेत्यांनी दिला नकार
मिठाई आकर्षक दिसावी म्हणून पूर्वी गडद रंगांचा वापर केला जात होता. मात्र, अशा रंगांचा अतिरेक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. नियमबाह्य रंगांच्या वापरावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. सणासुदीच्या काळात तपासणीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनीही सावध भूमिका घेतली आहे. मिठाईला अनावश्यक रंग देणे टाळले जात आहे. नैसर्गिक स्वरूपातील मिठाई काउंटरवर अधिक प्रमाणात दिसत असून ग्राहकांकडूनही अशा मिठाईला खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे.
केशर, वेलचीला पसंती
कृत्रिम रंगांचा वापर कमी करण्यासोबतच नैसर्गिक घटकांचा वापर वाढला आहे. केशर, वेलची आणि इतर नैसर्गिक घटकांपासून मिठाईला चव आणि आकर्षकता देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांच्या पसंतीतही बदल झाला आहे. अतिगडद रंगाची मिठाई पाहून अनेक ग्राहक आता सावध होत आहेत. रंगापेक्षा चव, ताजेपणा आणि दर्जाला प्राधान्य दिले जात आहे.
विक्रेत्यांकडून प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत
अन्नसुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाची तपासणी आवश्यक असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नियम पाळणार्या व्यावसायिकांना यामुळे दिलासा मिळतो. भेसळ करणार्यांवर कारवाई झाल्यास बाजारातील स्पर्धाही अधिक पारदर्शक राहते. गणेशोत्सवाच्या दिवसांत मिठाईची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुकानांमध्ये तयार मालाचा साठाही वाढविला जात आहे. ताजेपणा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.






