Ganeshotsav 2023 : भोरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत अलोट गर्दी

33 गणेश मंडळांकडून निरोप
भोर – भोर शहरातील 43 गणेशोत्सव मंडळांपैकी 33 गणेश मंडळांनी पाच दिवसांचे गणेश विसर्जन तर काही मंडळांनी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत स्वतंत्र मिरवणूक काढून ढोल- ताशाच्या गजरात श्री गणेशाच्या जयघोषात गणरायाला भोरच्या राजवाडा चौकातील शनी घाटावरील निरा नदी पात्रात रिमझीम पावासाच्या सरी झेलत विसर्जन करुन निरोप दिला.
शहरातील मानाच्या भोईराज गणेश मंडळ, नागराज आणि वेताळपेठ जुनी तालीम गणेश मंडळाचे गणपतीची आरती करुन मंडळांचे अध्यक्षांना मानाचा नारळ, भोर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक शंकर पाटील, तहसीलदार कार्यालयाचे मंडलाधिकारी सुनील धारम कांबळे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जाधव, सुप्रिया दुरंदे, गावकामगार तलाठी चंद्रशेखर जगताप, पोलीस हवालदार दत्तात्रय खेंगरे, उद्धव गायकवाड, विकास लगस उपस्थित होते.
यावेळी गुलालाची उधळण आणि ढोल- लेझीम व ढोलताशांची पथके, डिजेच्या निनादात ही विसर्जन मिरवणूक भोर नगरपालिका चौक, मंगळवार पेठ ते राजवाडा चौकापर्यंत भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. यावेळी काही मंडळांनी डिजेच्या तालावर मिरवणुकीत सहभाग घेतल्याने मिरवणुकिची रंगत वाढली होती.
राजवाडा चौकाजवळील शनिघाटावर नीरा नदी घाट परिसर गणपतीचे आरत्यांनी दुमदूमून गेला होता. शहरातील घरगुती आणि छोट्या मोठ्या मंडाळांनीही मोठ्या श्रद्धेने गणेश विसर्जन केले. काहींनी रामबाग येथील ऐतिहासीक नाल्यावर गणेश विसर्जन केले. काहींनी बसरापूर येथील भाटघर धरण जलाशयात पाच दिवसाचे गणेशोत्शोत्सवातील गणेशाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी भोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील गणेश मंडळांनीही विसर्जन मिरवणुका काढून गणेश विसर्जन केले.
जिवंत देखाव्याने लक्ष वेधले
भोरमधील नवयुग मित्र मंडळ, अमर तरुण मंडळ, नवरत्न मंडळ, गोल्डन गणेशोत्सव मंडळ, गणेश मंडळ, आदींनी मिरवणुकीत सहभागी न होता पारःपारिक पद्धतीने स्वातंञ मिरवणुका काढून गणेश विसर्जन केले. नवयुग मित्र मंडळाने सादर केलेल्या हनुमान आणि वानर सेना या जिवंत देखाव्याने गणेश भक्तांचे लाक्ष वेधून घेतले होते.





