पुणे | काश्मीरमधील गणेशोत्सवाची मिरवणुकीने सांगता

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य विसर्जन मिरवणुकीने बुधवारी सांगता झाली. या वेळी बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह इतरही अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल टाकले आणि गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकात दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला. यामध्ये ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी पुढाकर घेतला.
यंदा कुपवाडा आणि अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला. बुधवारी या दोन्ही ठिकाणच्या गणरायाचे भव्य अशा मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
पहिली मिरवणूक गणपतीयार मंदिर ते हबा कडल येथील झेलम नदीपर्यंत आणि दुसरी मिरवणूक वेसू केपी कॉलनी ते संगम अनंतनागपर्यंत अशा ११ कि.मी. अंतरापर्यंत निघाली. या दोन्ही मिरवणुकांत स्थानिक संगीत वाद्यांसह स्थानिक काश्मीरी नागरिक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.
एकतेचे प्रतीक
काश्मीरमधील गणेशोत्सवातील वैशिष्ट्ये म्हणजे बाप्पाची होणारी पन्ना पूजा. ज्यामध्ये श्रीगणेशाला पोळीचा नैवद्य अर्पण केला जातो. ही पूजा म्हणजे एकता आणि सामुदायिक सौहार्दाचे प्रतीक मानले जाते.
काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. पुण्यातील सातही प्रमुख गणेश मंडळांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आगामी काळात हा उत्सव आणखी भव्य स्वरूपात साजरा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न राहतील. काश्मीर खोऱ्यातील सर्व गणेश मंडळांचे आणि नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.
– पुनीत बालन उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.





