Ganesh Festival : देशाच्या राजधानीत गणेश उत्सवाची धूम; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

Ganesh Festival – देशाच्या राजधानीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी विविध प्रांतातील मराठी भाषिक एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या निनादात मग्न झालेले दिसून येत आहेत. दिल्लीमध्ये असलेली महाराष्ट्रीयन सोसायटी पश्चिम विहार येथील आनंदवन सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर काही सार्वजनिक मंडळ देखील दरवर्षी गणेशाची स्थापना करतात.
प्रत्येक मंडळांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. दिल्ली आणि एनसीआर द्वारका, फरिदाबाद, नोएडा येथील काही मंडळांतून विधिवत गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा, आरती कार्यक्रम आणि मिरवणूक विसर्जन हे सारे उत्साहाने पार पडते. दिल्लीमध्येच नव्हे तर एनसीआरमध्ये देखील वेगवेगळ्या मंडळातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध मंडळ तयार करण्यात आली आहे.
या सगळ्याच मंडळातून महाराष्ट्रातील लोकधारा, दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल , स्थानिक उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची तळमळ दिसून येते. तर काही मंडळांचा अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा ‘महाप्रसाद’ दिल्लीपासून ते थेट त्याच्या गावातील गल्लीपर्यंतच्या गणेश मंडळांची आठवण ‘मराठी माणूस’ला करून देतो.
याशिवाय संस्कृतीचे आदानप्रदान होऊन नॉन महाराष्ट्रीयनांनाही बोटं चाखत महाप्रसादातील व्यंजनांची कृती जाणून पदार्थ करून बघण्यास उद्युक्त करतो. पूर्व दिल्ली येथील आनंदविहारचे पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ अनेकांना गणेशाची आरती करण्यासाठी निमंत्रण देते.
दक्षिण दिल्लीत सार्वजनिक उत्सव समिती दरवर्षी दिल्ली हाट आयएनए येथे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील गाजलेली नाटकांची मेजवानी दिल्लीकर मराठी रसिकांना देणे. यावर्षी प्रसिद्ध कलाकार प्रशांत दामले यांच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे आयोजन केले आहे.
जुन्या महाराष्ट्र सदनातील हिरवळीवर वाजतगाजत दहा दिवसांकरिता गणपती बाप्पा विराजमान होतो. इथल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यास दिल्लीभरातून भाविक येतात. इथे महाराष्ट्रातील लोकधारा, वाद्य झांज पथक यांच्या सादरीकरणाने मंडी हाऊस येथील परिसर दुमदुमून जातो.
आयटी हब असलेल्या गुरुग्राममधील सार्वजनिक गणेशोत्सव समिती नेहमीच अग्रेसर असते. यंदा प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन यांची गाण्याची मैफल गुरुग्राम मध्ये आयोजित करण्यात आली होती.





