ganesh festival 2024 : बार्शीच्या गौरी मुखवट्यांना विदेशातही मागणी

ganesh festival 2024 – बार्शीच्या अनंत उपरे यांनी तयार केलेल्या गौरी च्या (महालक्ष्मी ) सुबक डोळ्यात जिवंतपणा असलेल्या मुखवट्याना आता सातासमुद्रापलीकडे इंग्लड, अमेरिकेतूनही मागणी होत आहे. राज्य- परराज्यातील व्यापारी दरवर्षी बार्शीतील मूर्तिकार अनंत उपरे यांच्या मंगळवार पेठेतील सटवाई मंदिरानजीक असलेल्या गणपती, गौरी मुखवटे तयार करणाऱ्या शंभर वर्षांपूर्वी पासूनच्या कारखान्यात येतात.
जुन्या पिढीतील नामवंत पेंटर व अनंत उपरे यांचे आजोबा कै.बाबूराव उपरे यांनी सुरु केलेला हा मूर्तिकलेचा व्यवसाय पुढे वडील माणिक उपरे व आता तिसरी पिढीतील अनंत उपरे त्यांच्या पत्नी सुवर्णा, मुलगा प्रसाद, सून श्रद्धा व मुलगी पूजा हे यशस्वीपणे चालवत आहेत.
वर्षभर या कारखान्यात महालक्ष्मीचे मुखवटे तयार करण्याचे काम दिवस रात्र सुरु असते. पुणे, मुंबई, संभाजीनगर, ठाणे, बीड, लातूर येथून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मुखवटे खरेदीसाठी बार्शीला येतात. दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार गौरीचे मुखवटे विक्री होतात. विविध २९ प्रकारचे पीओपी व फायबरचे मुखवटे तयार होतात.
त्यात प्रामुख्याने पेन, पुणे स्पेशल,अमरावती देवसेना, कोल्हापूरी साज, बार्शी उपरे आम्रपाली स्पेशल यांचा समावेश आहे. तसेच उपरे यांच्या कारखान्यात महालक्ष्मीच्या सुबक मुखवट्याबरोबर कापडी हात, पिओपी व फायबर हाफ व फुल बॉडी,कापडी हाफ बॉडी, फायबर मुखवटे, खेळणी एका छताखाली तयार केले जातात त्यामुळे येथे वर्षभर ग्राहकांची वर्दळ असते.
कुठलाही स्टॉल नाही तरीही मागणी
विशेष म्हणजे उपरे यांनी विक्रीसाठी कुठेही स्टॉल टाकला नाही. त्यामुळे व्यापारी व ग्राहक बार्शीत येऊन स्वतः मुखवटे पॅक करून नेतात. बार्शीतील अनंत उपरे यांच्या कारखान्यात वर्षभर महालक्ष्मी मुखवटे तयार करण्यात येतात.
त्यांच्या या कामात सुवर्णा उपरे यांच्यासह कुटुंबातील सर्वच व्यक्ती हातभार लावतात. अलीकडच्या काळात गौरी मुखवट्यामध्ये नवनवीन प्रकार आलेले आहेत. नव्या पध्दतीने मुखवटे बनवण्यावर उपरे यांचा भर असतो.





