Ganesh Chaturthi 2023: भारतीय सैनिक सीमेवर साजरा करणार गणेशोत्सव; दगडुशेठ ट्रस्टकडून श्रींच्या मूर्ती रवाना

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येते नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील 33, 19, 1, 5 आणि 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह भारताच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पुणे येथील दगडुशेठ गणपती ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब 2 फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग 13 वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि मोठमोठ्या पूजा मंडपात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना शुभ मुहूर्तावर करतात. चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 02:09 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3:13 वाजता समाप्त होईल. 19 सप्टेंबर रोजी उदय तिथीवर आधारित गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश मूर्तीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 ते दुपारी 01:34 पर्यंत आहे.





