सण-उत्सव : गणाधीश

गणाधीश, गणांचा अधीपती गजवदन गणपती भाद्रपद चतुर्थीला गणेश प्रतिष्ठापना केली जाते. पुराणकाळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा धार्मिक भावनेतून जोपसण्याचे संस्कार आपल्या भारतीय परंपरेत प्रकर्षाने जाणवतात. कुठेतरी नतमस्तक होण्यासाठी काही निसर्गनिर्मित तत्त्व नकळत पाळत असतो.
परमेश्वर सगळ्या चरामध्ये भरून व्यापलेला आहे. एक शक्ती जी मानवाने कधीच अमान्य केली नाही करणार ही नाही तरीही या ईश ईश्वरी संकल्पनेला मानवी मन मी, माझ्या, आम्ही अशा प्रतिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करते मग इथेच कुठेतरी भावना दुखावण्याचे शल्य मानवी मनाला जाणवते. देवाची प्रतिमा ही प्रतिष्ठतेच्या कोंदणात अडकलेली नसावी. ती सर्वव्यापी संकल्पना ठरावी तरच हा उत्सव खर्या अर्थाने मने जोडणारा ठरेल.
विदित असलेल्या संकल्पनेला उत्सवाचे स्वरूप आणल्यामुळे घराघरात पोचलेला हा गणेशोत्सव दहा अकरा दिवस प्रत्येकाच्या मनात विराजमान होऊन नकळत मानवी संवेदना व्यक्तीनुसार टिपणारा बाप्पा विराजित होतो आणि चैतन्याची स्वप्नाची झालर पसरवून मनामनातही पोहचतो.
बदलत्या परिस्थितीनुसार गणेशउत्सवाचे स्वरूप पद्धती बदलली तरी मूळ संकल्पना भावना श्रद्धा सर्वमानवीय एकच आहेत. फक्त त्यातील कंगोरे समाज जाणिवानुसार बदलत जातात. गणेशोत्सवात सेवाभावाने काम करणारे आणि प्रतिष्ठा जपणारेही गणेशभक्त एक होऊन एकाच शक्तीने कधी प्रेरित होतात हे त्यांनाही कळत नाही. तो गणाधीश ‘मी’ला आपल्या आनंदात कधी बदलवतो हे कळतही नाही. असा हा गणेशोत्सव मनामनांद्वारे जनाजनात पोहोचला.
परमेश्वरी चैतन्य या दहा दिवसांत पृथ्वीवर अवतरते आणि एक उत्साह पसरतो. विशेष म्हणजे उत्सवामुळे आर्थिक उलाढाली होतात. त्यामुळे लक्ष्मीची बरसात करून देणारी मानवी मनांना संवादाच्या रूपाने जवळ आणते. सर्वभूलोकीचे कल्याण करणारी सृजनशीलता ही या उत्सवाच्या रूपाने वृद्धिंगत होते.





