गलवान हिंसा पूर्वनियोजित कट; परराष्ट्रमंत्र्यांनी चीन’ला सुनावले

नवी दिल्ली: भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणादरम्यान जयशंकर यांनी चीनला सुनावले. मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर यांनी वांग यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, गलवान व्हॅलीमध्ये जे काही घडले ते चीनचा पूर्वनियोजित कट होता.
दरम्यान, सीमेवरील तणाव लवकरात लवकर कमी करण्यावर दोन देशात एकमत झाले. गलवान खोऱ्यात घटनेचा योग्य पध्दतीने विचार करू. आणि सीमावर्ती भागात शांतता कायम राखू, या मुद्द्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि भारतचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात एकमत झाले.
याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिध्दीस दिले. प्रत्यक्षातील स्थिती लवकरात लवकर सामान्य करण्यासाठी दोन्ही बाजूने एकमत झाले. दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार सीमेवर शांतात नांदण्यासाठी प्रयत्न करण्याचे दोन देशांत ठरले आहे.
वांग यांनी सांगितले की, भारताने परिस्थितीचा शोध घ्यावा. जबाबदार असणअऱ्यांवर कारवाई करावी. सर्व प्रकारची प्रक्षोभक कृत्ये थांबवावीत. पुन्हा अशी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
चीनने दिलेल्या निवेदनात, भारताला शांततेने ही समस्या सोडवायची इच्छा आहे. चर्चेने या भागातील तणाव कमी करावा असे जयशंकर यांनी सांगितले असल्याचे म्हटले आहे.





