एक कोटी 13 लाखांच्या आठ मोटारी हस्तगत : गुन्हे शाखेची कामगिरी
पिंपरी – आंतर राज्य अंमली पदार्थांची तस्करीसाठी अलिशान मोटार चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून बारा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यापैकी एक कोटी 13 लाखांची आठ वाहने हस्तगत केली.
ओमप्रकाश लादुराम बिष्णोई (वय 28, रा. रोहिला, जि. बाडमेर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चोरींचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. वाहन चोरांची ही टोळी राजस्थानमधून येऊन महागड्या मोटारी चोरत असे.
बारा गुन्हे उघडकीस
सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपी ओमप्रकाश याला अजमेर येथे पकडले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसह मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून एकूण 12 महागड्या मोटारी चोरल्याची कबुली दिली. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार, निगडी पोलीस ठाण्यातील दोन, चिखली, भोसरी, देहूरोड, वाकड, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सह पोलीस आयुक्तप्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्तरामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, पोलीस कर्मचारी शिवाजी कानडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सचिन मोरे, मारुती जायभाये, अंजनराव सोडगीर, प्रमोद गर्जे, प्रवीण पाटील, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, तानाजी पानसरे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, नाजुका हुलावळे, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.
साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास
चेसिस नंबर व इंजिन नंबर बुजवून चोरलेल्या मोटारींचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर केला जात होता. आरोपी ओमप्रकाश याला अमली पदार्थ तस्करीमध्ये दहा वर्षाची शिक्षा झाली होती. सात वर्ष शिक्षा भोगल्यावर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अलिशान वाहनांची चोरी करू लागला. आरोपींना पकडण्यासाठी तसेच चोरलेली वाहने हस्तगत करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास केला.
दहा मिनिटांमध्ये वाहन चोरी
आरोपी रस्त्यावर लावलेल्या वाहनांना सर्वांत अधिक निशाना बनवत होते. ते हाताने काच फोडून आतील मोटारीचा आयसी बदलत असे. त्यानंतर कोणत्याही चावीने मोटार सुरू करीत असे. या कामासाठी त्यांना अवघा दहा मिनिटांचा कालावधी लागत असे.
व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क
जर एखाद्या सहकाऱ्याने फोन उचलला नाही तर चोरटे त्याला व्हिडिओ कॉल करीत होते. त्यात काही संशस्पद आढळले तर ते फोन बंद करून पसार होत होते. यामुळे आरोपीच्या साथीदाराचा व्हिडिओ कॉल आल्याने पोलिसांनी एक बस थांबवून त्यातून आरोपी ओमप्रकाश याला बोलायला सांगितले. तो साथीदार चोरलेली गाडी घेऊन ओमप्रकाश याने सांगितलेल्या ठिकाणी आला. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने तो चोरीचे वाहन तिथेच टाकून पळून गेला.