गागोदे ते वर्धा 850 कि.मी.अंतर 23 दिवसांत

शिक्रापूर – महात्मा गांधी यांच्या 150 व्या आणि राष्ट्रसंत आचार्य विनोबा भावे यांच्या 125 व्या जयंतीच्या, तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित अनोख्या सायकल यात्रेस आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव गागोदे (रायगड) ते सेवाग्राम, वर्धा सायकल यात्रा आज शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पोहोचली. यावेळी सरपंच जयश्री भुजबळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भुजबळ, ओबीसी सेलचे शिरूर तालुकाध्यक्ष अशोक भुजबळ, विद्या बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे, दत्तात्रय भुजबळ, संभाजी ढमढेरे, सचिन पंडित उपस्थित होते. सद्भावना संदेश पोहोचविणारे पन्नास सायकल यात्री सहभागी आहेत. विनोबांचे जन्मगाव गागोदे ते गांधीजींचा वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, असे 850 किलोमीटरचे अंतर 23 दिवसांत पूर्ण करणार आहेत. रायगड- पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-बुलढाणा-अमरावती-वर्धा अशा एकूण अकरा जिल्ह्यातून ही यात्रा सदभावना, अहिंसा आणि समतेचा जागर करणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे कौस्तुभ आमटे, गोरक्षनाथ वेताळ, मच्छिंद्र शिंदे, पूजा पोपळघट, दीपक काळे आणि राहुल संत यांनी दिली.
93 वर्षांचे ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक डॉ. एस. एन. सुब्बराव वंचितांसाठी पूर्णवेळ व विनामानधन 5 वर्षे भारतात काम करणारे भारतसेवक निक कॉक्स, पाकिस्तान सीमेवरील शारिफाबाद येथून यात्रेत सहभागी झालेला बिलाल अहमद रथार, पूर्वोत्तर भारतातून आलेला सुनील तमांग, रमेशभाई ठाकुर हा दिव्यांग, वांबोरी येथील नऊ वर्षाचा इशान वेताळ आणि विविध वंचित समूहाचे अपंगांचे आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात्रेत सहभागी झाले आहेत. यात्रेत गीते, पथनाट्य, थेट युवा संवाद, सर्वधर्म प्रार्थना आदी उपक्रम होणार आहेत. सायकल यात्रेचा प्रवास होणाऱ्या जिल्ह्यात स्वागत समित्यांची स्थापना केली आहे.





