भारतात टेस्ला कारच्या निर्मितीसाठी गडकरीचं इलॉन मस्क यांना आमंत्रण

मुंबई – रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ते रायसिया डायलॉग 2022 मध्ये बोलत होते.
गडकरी म्हणाले की, इलॉन मस्क यांना भारतात चांगली बाजारपेठ मिळेल. भारतीय बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे भारतासाठी आणि मस्क यांच्यासाठी विन-विन परिस्थिती आहे. जर मस्क यांनी भारतात कारचे उत्पादन केले तर त्यांची बचत होईल. शिवाय चांगला नफा देखील मिळेल. त्यामुळे मी त्यांना भारतात येऊन उत्पादन सुरू करण्याची विनंती करतो, असंही गडकरींनी नमूद केलं.
यावेळी नितीन गडकरी इलॉन मस्कबाबत थोडे मवाळ दिसले. वास्तविक पाहता, याआधी मोदी सरकार टेस्ला कंपनीसंदर्भात कठोर होते. तसेच टेस्लाला सवलत देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.
गेल्या वर्षी एलोन मस्क यांनी सरकारकडे इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर टेस्लाने भारतात इलेक्ट्रिकल वाहनांचे उत्पादन सुरू केल्यानंतरच सरकार कोणत्याही करमाफीचा विचार करेल, असं त्यावेळी अवजड उद्योग मंत्रालयाने म्हटले होते.





